भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरला मोटारसायकलीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला. मोहित दोडेजा असे या तरुणाचे नाव आहे. सायन तुर्भे रस्त्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात घडला.
मुलुंड येथे राहणारा मोहित चेंबूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकतो. मंगळवारी ठाणे येथे राहणाऱ्या अक्षय सदनानी (१९) या मित्राच्या मोटारसायकलीवरून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्यासमोरून भरधाव वेगाने एक डंपर जात होता. महाविद्यालयाच्या काही अंतरावर उमरशी बाप्पा चौक येथे डंपरने अचानक डावे वळण घेतले. त्यामुळे अक्षयला मोटारसायकल नियंत्रित करता आली नाही आणि ती डंपरला धडकली.यात मोहितच्या डोक्याला जबर मार लागला होता. डंपरचालक संजय गौड (३१) याला नंतर अटक करण्यात आली.