गेले दहा महिने बंद असलेली लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरलेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्याचे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रथमच दिले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वाना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

करोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

गेल्या महिन्यात दक्षिण रेल्वेने चेन्नई शहरातील उपनगरीय सेवा सुरू केली. सकाळी ७ ते ९.३० आणि सायंकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवेश दिला जातो. सकाळी ७ पूर्वी किंवा ९.३० नंतर सायंकाळी ४.३० पर्यंत तसेच रात्री सातनंतरच सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली जाते. या धर्तीवरच मुंबईतही चेन्नई प्रारुप राबविण्यावर चर्चा झाली.

पुन्हा बैठक..

राज्य सरकार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये या आठवडय़ात पुन्हा बैठक होईल. यात गर्दीवर नियंत्रण आणण्याकरिता कोणता प्रस्ताव  योग्य आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतरच कोणाला आणि कधी रेल्वे प्रवासाची मुभा द्यायची याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.