मुंबई : यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठय़पुस्तके मिळाली. मात्र कोऱ्या पुस्तकांचा वास, त्याची नवलाई आणि हाती नवे पुस्तक पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावरील आनंद ओसरण्यापूर्वीच पाठय़पुस्तकांची पाने वेगळी होण्यास सुरूवात झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर बालभारतीने फाटकी पुस्तके दुकानामधून बदलून घ्यावीत, अशी सूचना केली आहे.

यंदा एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट करून एकात्मिक पाठय़पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. साधारणत: तीन महिन्यांसाठी एक पुस्तक शाळेत नेणे विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरणारे असले तरी त्यामुळे पुस्तकाची जाडी वाढली आहे. त्यातच यंदा या पुस्तकांत प्रत्येक पाठानंतर वहीचे पानही समाविष्ट करण्यात आले. त्यामुळेही पुस्तकाच्या जाडीत भर पडली आहे. राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या. अवघ्या चार दिवसांत पुस्तकांची पाने सुटून पुस्तके खिळखिळी झाली आहेत. दोन दिवस पुस्तके हाताळताच पुस्तकाची पाने सुटत असल्याची शिक्षक, पालकांची तक्रार आहे.

दरम्यान, फाटकी, पाने सुटलेली पुस्तके दुकानातून बदलून घ्यावीत. त्याबाबत वितरकांना सूचना दिलेल्या आहेत, असे बालभारतीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुस्तकांची छपाई मोठय़ा संख्येने होते. त्यामुळे ती वेगवेगळय़ा मुद्रकांकडून करून घेतली जाते. सर्वच भागांतील पुस्तकांबाबत अशी तक्रार नसल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला. काही विशिष्ट मुद्रकांबाबत किंवा विभागात वितरित झालेल्या पुस्तकांबाबत तक्रारी असू शकतील. ज्या विभागातून तक्रारी आल्या आहेत, तेथील शाळांमध्ये अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

शिलाईही अशक्य

पूर्वी पुस्तके शिवलेली असत. मात्र आता पुस्तकांची पाने मुखपृष्ठाला गोंद लावून चिकटवलेली असतात. त्यामुळे पुस्तके शिवता येतील अशाप्रकारे पानांवर जागा सोडलेली नसते. त्यामुळे पुस्तकांची पाने सुटत असली तरी ती शिवता येणेही शक्य नाही, असे एका शिक्षकाने सांगितले.
कारणे काय? सर्वच मुले काळजीपूर्वक पुस्तके हाताळत नाहीत. पुस्तकांचा आकार मोठा असल्याने वाचताना पुस्तक दुमडले जाते. त्यामुळे पाने सुटत आहेत. मुळात पुस्तके मुले हाताळणार आहेत, हे लक्षात घेऊन त्याची बांधणी करणे आवश्यक होते, असे मत एका शिक्षकाने व्यक्त केले.