मुंबई : धारावी पुनर्विकासाअंतर्गत ५०० चौ फुटाचे घर मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी धारावीकरांनी धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन तीव्र केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रविवार, ४ फेब्रुवारी रोजी धारावीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना ३५० चौ फुटाची घरे देण्याचे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) जाहीर केले आहे. मात्र धारावीकर ५०० चौ फूट घराच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे धारावीतील अपात्र रहिवाशांनाही पुनर्विकासात सामावून घेऊन त्यांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र या अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे देण्यात येणार आहेत. यासाठी डीआरपीपीएलने नुकतेच मुंबई महानगर पालिकेला एक पत्र पाठवून मुलुंडमधील ६४ एकर जागेची मागणी केली आहे. यासाठी अन्य ठिकाणीही जागा शोधण्यात येत आहे. त्यामुळे अनेक धारावीकर अपात्र म्हणून धारावी बाहेर फेकले जाणार आहेत. याला धरावीकरांचा विरोध आहे.
आणखी वाचा-मुंबईत थंडी वाढण्याची शक्यता
सरसकट सर्व अपात्र-पात्र धारावीकरांना धारावीतच घरे द्यावीत अशी मागणी धारावीतील रहिवाशांची आहे. याच मागण्यांसाठी आता धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून अदानी विरोधातील आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. रविवारी ९० फुटी रोड येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र आता ही जाहीर सभा रद्द करण्यात आल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समनव्यक अँड. राजू कोरडे यांनी दिली. पोलिसांची परवानगी, जागेची अडचण आणि इतर कारणाने ही सभा रद्द करावी लागली आहे. मात्र लवकरच सभेची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल आणि धारावीकर मोठ्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील असेही त्यांनी सांगितले.