राज्याचे महाधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिला असून राज्य सरकारने तो स्वीकारला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवीन महाधिवक्त्यांची नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या महाधिवक्त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर सहा महिन्यांपूर्वी मनोहर यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मनोहर हे नागपूरमधील प्रसिद्ध वकील असून त्यांचे फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत, पण कौटुंबिक अडचणींचे कारण देत मनोहर यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना दिली होती. त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण मनोहर यांनी आपला निर्णय कायम ठेवल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
नवीन सरकार सत्तेवर आल्यावर सहा-सात महिन्यांत महाधिवक्त्यांनी राजीनामा दिल्याने त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मनोहर यांची या पदावर नियुक्ती झाल्यावरही अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारने मोठी फी देऊन विशेष सरकारी वकील नेमले होते. गोवंश हत्याबंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मनोहर यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरूनही गोंधळ झाला होता. त्यामुळे महाधिवक्त्यांच्या राजीनाम्याचे कारण वैयक्तिकच आहे, की अन्य कारणे आहेत, याविषयी चर्चा होत आहे. महाधिवक्ता केवळ कायद्यावर प्रभुत्व असलेलाच नाही, तर या पदाची उच्च परंपरा सांभाळणारा असावा, या दृष्टीने नवीन महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हे संबंधितांशी विचारविनिमय करीत असल्याचे समजते.

‘मतभेद नाहीत’
नागपूर: सरकारशी कोणतेही मतभेद नाहीत. अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा दिला, असे राज्याचे माजी महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी निवासस्थानी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले, मी राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे दिला आहे. त्यावर सार्वजनिकरित्या चर्चा होऊ शकत नाही.