बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलला पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांनी भेट दिलेला ‘आयफोन’ आता या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. याशिवाय वाशीतील ज्या फ्लॅटमध्ये या मॉडेलला नेण्यात आले होते त्या दिवशीच्या सोसायटी रजिस्टरमध्ये पारसकर तसेच मॉडेलच्या गाडी क्रमांकाची नोंद असल्याचे आढळून आले आहे. या फ्लॅटमध्ये आपला विनयभंग झाल्याचा दावा या मॉडेलने केला आहे आणि त्यानंतर मढ येथील बंगल्यात आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिचे म्हणणे आहे.
बलात्कारप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना संबंधित मॉडेलने प्राथमिक निष्कर्ष अहवालात जी माहिती दिली होती ती बरीचशी आठवणींच्या आधारे दिली होती. त्यानंतर पुरवणी जबाबामध्ये तिने काही पुरावे सादर केले आहेत. त्यामध्ये पारसकर यांना दिलेले ६७ हजार ५७५ रुपयांचे लॉनजिन्स ब्रँडचे घडय़ाळ, २१ हजार ६०० रुपये किमतीचे पाकीट, ३३ हजार रुपयांचे माऊंट ब्लँक पेन आणि पाच हजार रुपयांचे परफ्युम या भेटवस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याने संबंधित मॉडेलच्या बाजूने गुन्हा दाखल केल्यानंतर या भेटवस्तू देण्यात आल्या, असे या जबाबात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पारसकर यांनी आयफोन भेट दिला होता. हा फोन मॉडेलने सादर केला असून त्यात ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश आणि फोनमधील एसएमएस तपासण्याची विनंती केली आहे.
वाशी येथील ज्या फ्लॅटमध्ये विनयभंग झाला त्या फ्लॅटमध्ये आपण आणि पारसकर एकत्र गेल्याचा पुरावा म्हणून सोसायटीचे रजिस्टर तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. या रजिस्टरमध्ये पारसकर आणि मॉडेलचे गाडी क्रमांक नोंदल्याचे आढळून आले आहे. मढमधील ज्या बंगल्यात बलात्कार झाल्याचा दावा केला आहे त्या ठिकाणी वास्तविक एक बिल्डर येणार असून त्याच्याकडून स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमीष पारसकर यांनी दिले होते, असेही या पुरवणी जबाबात म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात मढमधील बंगल्यात पारसकर यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. तेव्हाच त्यांनी बलात्कार केला, असा या मॉडेलचा आरोप आहे. या पुरवणी जबाब आणि त्यासोबतच्या पुराव्यांमुळे पारसकर यांच्यापुढील अडचणी वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘मॉडेलच्या माजी वकिलाची सनद रद्द करा’
पारसकर यांच्याविरोधात प्रकरण न्यायलयात असताना या मॉडेलवर आरोप करणाऱ्या तिच्या माजी वकिलाची सनद रद्द करा, अशी मागणी राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र बार काऊंसिलकडे केली आहे. मॉडेलचे पहिले वकील अ‍ॅड रिझवान सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देत मॉडेल आणि त्याच्यात झालेल्या संभाषणाच्या चित्रफिती उपलब्ध करून दिल्या. सिद्दीकी यांनी मॉडेलवर आरोप करत तिची बदनामी केल्याचा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी केला आहे. सिद्दीकी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची रसद रद्द करा, अशी मागणी त्यांनी बार काऊंसिलला लिहिलेल्या पत्रात केली आहे. अशाप्रकारचे वर्तन हे कलम १२६ अंतर्गत पुरावे कलमाचा भंग करणारे आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. पारसकरांच्या अटकपूर्व जामिनाच्या वेळीच हा वकील कसा काय माध्यमांपुढे आला असा सवालही शहा यांनी केला.