Supriya Sule on Balasaheb Thorat CM Post Statement : काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं होतं. “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री उशीरा मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “प्रत्येक पक्षाला आणि कार्यकर्त्याला आपला नेता आपला पक्ष मोठा व्हावा, अशी अपेक्षा असते, त्यात गैर काहीही नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेही वाचा – अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त

“आम्ही कोणत्याही शर्यतीत नाही”

दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री आमचाच होईल अशी विधानं केली जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे का? आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? असं विचारलं असता, “राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी मांडली होती. आम्ही कोणत्याही शर्यतीत नाही. हे त्यांनी स्पष्ट केलं होतं”, असे त्या म्हणाल्या.

“ट्रीपल इंजिनच्या सरकारविरोधात आम्ही ताकदीने लढू”

पुढे बोलताना “आज महाराष्ट्रासमोर बेरोजगारी आणि भ्रष्टाचार असे असंख्य मुद्दे आहेत. अपेक्षित असा विकास होत नाही. राज्यातील जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या ट्रीपल इंजिनच्या सरकारविरोधात आम्ही ताकदीने लढू, हीच आमची भूमिका आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचं बाळासाहेब थोरातांना आव्हान? विधानसभा लढवण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “संगमनेरमधून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले होते होते?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.