मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. दरम्यान, या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“मी यापूर्वीही सांगितलं आहे, की अंधेरी पूर्वची जागी शिवसेनेची आहे. दिवंगत रमेश लटके यांनी आपल्या कार्यकतृत्वातून सिद्ध केलेली ही जागा आहे. त्यामुळे ती जागा आम्ही जिंकणं फार स्वाभाविक होतं. मात्र, भाजपाने अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी अर्ज दाखल केला आणि जेव्हा लक्षात आलं आपण निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा सुसंस्कृतपणा वगैरे कारणं देऊन माघार घेतली. परंतु आता नोटा मिळालेली मतं बघितली, तर भाजपा किती कपटनितीचे राजकारण करू शकते, याचा अंदाजा येईल”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.