अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडूनही (ईडी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या खात्यांवरुन झालेल्या व्यवहारांमध्ये कोणतीही संक्षयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. सुशांतच्या कुटुंबियांचा गैरसमज झाल्याने त्यांनी आर्थिक व्यवहारांसंदर्भातील शंका उपस्थित केल्याची शक्यता ईडीच्या सुत्रांनी मुंबई मिररशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळेच सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शननंतर आर्थिक व्यवहारांसंदर्भातील प्रकरणातही रियाला दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. अमली पदार्थांसंदर्भातील प्रकरणात अटक करण्यात आलेली रिया सात ऑक्टोबर रोजी २८ दिवसांनी जामीनावर तुरुंगाबाहेर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केल्यानंतर तिची सुटका करण्यता आली. रियाला ८ सप्टेंबरला अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर ईडीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि बँक खात्यांची तपासणी केली. सुशांतच्या खात्यावरुन मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आल्याचे दावे करण्यात आल्यानंतर ईडीने ही चौकशी सुरु केली. मात्र चौकशीनंतर सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल कुटुंबाला काहीच कल्पना नसल्याचे ईडीच्या लक्षात आले. याचमुळे कुटुंबियांनी गैरसमज झाल्याने सुशांतच्या मृत्यूनंतर पैशांच्या व्यवहाराबद्दल संक्षय व्यक्त केला होता. मात्र ईडीला सुशांतच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहारांमध्ये कोणतीही संक्षयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही असं या प्रकरणाशी संबंधित सुत्रांनी मुंबई मिररशी बोलताना स्पष्ट केलं आहे. सध्या ईडीकडून सुशांतच्या खात्यावरुन करण्यात आलेल्या काही छोट्या रक्कमेच्या व्यवहारांचा तपास सुरु आहे. हे पैसे कसे आणि कशासाठी पाठवण्यात आले याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ईडीने ३० जुलै रोजी प्रव्हेंशन ऑफ मनी लाँण्ड्रींग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल करुन घेतला. पाटणा पोलिसांनी २५ जुलै रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर हा ईसीआयआर दाखल करण्यात आला. या एफआयआरमध्ये सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसहीत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया आणि तिच्या इतर साथीदारांनी सुशांतवर आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांवर स्वत:च्या फाद्यासाठी नियंत्रण मिळवलं होतं असा आरोप केला होता.

अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये सुशांतच्या अकाऊंटवरुन १५ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला होता. १७ कोटी रुपये असणाऱ्या खात्यातून १५ कोटी काढण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे होते. सुशांतच्या खात्यावर तक्रारीमध्ये नाव असणाऱ्या सहापैकी कोणत्याही व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते का याचा तपास करावा अशी मागणी के. के. सिंह यांनी केली होती. “आतापर्यंत या प्रकरणामध्ये काहीही संक्षयास्पद आढळून आलेले नाही. सुशांतची बँक खाती, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये काहीही आढळून आलेले नाही. मात्र अद्याप तपास सुरु आहे,” असं या प्रकरणाबद्दल बोलताना ईडीच्या सुत्रांनी म्हटलं आहे.

कुटुंबाने केलेल्या १५ कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या आरोपांबद्दल विचारले असता, “त्यांचे काहीतरी गैरसमज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राजपूत कुटुंबाला सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल काहीही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. उदाहरण त्याने त्याच्या चार्टड अकाऊंटटच्या माध्यमातून स्वत:चे कर भरले आहेत. कुटुंबाला या गोष्टींची काहीच कल्पना नसणार,” असं ईडीच्या सुत्रांनी म्हटलं आहे. या खात्यांमधील दोन कोटी ७८ लाख रुपये कर म्हणून देण्यात आले. यामध्ये जीएसटीचाही समावेश असल्याचे दिसून आल्याचं ईडीच्या सुत्रांनी सांगितलं. “सुशांतच्या खात्यावरील काही पैशांचा हिशोब अजून लागलेला नाही. ही रक्कम कुठे गेली याचा आम्ही सध्या तपास करत असून ती कोणाला आणि का पाठवण्यात आली याचा शोध घेत आहोत,” असं ईडीच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. मात्र या सर्व प्रकरणामध्ये रियाच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याचं ईडीला आढळून आलेलं नाही. सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करत असल्याने थोड्याफार प्रमाणात काही रक्कम एकमेकांच्या खात्यांवर पाठवण्यात आली असेल असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

आधी अतिरिक्त महाधिवक्ता असणारे राजपूत कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनीही, “सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती नव्हती. कारण कुटुंबियांनी त्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये कधीच दखल दिली नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. ईडीकडून सध्या तपास सुरु असून संपूर्ण चौकशीनंतरच काय ती माहिती समोर येईल,” असं म्हटलं आहे. “तपास यंत्रणांना आम्ही आमच्या मनात असणाऱ्या शंका सांगितल्या आहेत. सुशांतच्या खात्यावरुन आरोपींच्या खात्यावर काही पैसे पाठवण्यात आलेत का याचा तपास करण्याची विनंती आम्ह ीकेली होती. त्याचा चार्टड अकाऊंट बदलण्यात आला होता आणि त्याची बहिणी प्रियंकाही त्याच्यापासून दुरावली होती,” असंही सिंग पुढे म्हणाले.