मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी एक तानसा धरण बुधवारी २३ जुलै रोजी भरून ओसंडून वाहू लागले. बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हे धरण ओसंडून वाहू लागले. आतापर्यंत सातपैकी तीन धरण काठोकाठ भरले आहेत. सातही धरणांतील पाणीसाठा बुधवारी ८६ टक्क्यांपुढे गेला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतील पाणीसाठा ८६.८८ टक्के झाला आहे. यंदा लवकर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होते आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणाचे’ तीन दरवाजे ७ जुलै रोजी उघडण्यात आले आहेत. तर, ९ जुलै रोजी मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागले होते. त्यापाठोपाठ बुधवार, २३ जुलै रोजी तानसा धरणही ओसंडून वाहू लागल्याची माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. बुधवार, २३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सातही धरणांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६.८८ टक्के इतका जलसाठा आहे.

तानसा धरण २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता, २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर १४ जुलै २०२२ रोजी आणि २२ जुलै २०२१ रोजी ओसंडून वाहू लागले होते. तानसा धरणाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लिटर (१४५,०८० दशलक्ष लिटर) एवढी आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – ७६.६४ टक्के

मोडक सागर – १०० टक्के

तानसा – ९८.६१ टक्के

मध्य वैतरणा – ९४.२५ टक्के

भातसा – ८४.८६ टक्के

विहार –  ५७.२८ टक्के

तुळशी – ५८.७५ टक्के

एकूण – ८६.८८ टक्के