मुंबई : भारताच्या कर्करोग उपचार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत, मुंबईतील नामवंत टाटा मेमोरियल सेंटरने देशात प्रथमच उच्च मात्रेतील एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ही थेरपी न्यूरोब्लास्टोमासारख्या दुर्मिळ आणि गंभीर प्रकारच्या बालकर्करोगावर प्रभावी उपाय म्हणून पुढे आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

मेटायोडोबेंझायलगुआनिडिन (एमआयबीजी) ही एक विशिष्ट रेडिओएक्टिव औषध आहे, जी प्रामुख्याने न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरमध्ये वापरली जाते. या थेरपीमध्ये एमआयबीजीमध्ये आयोडीन-१३१ या रेडिओआइसोटोपचा समावेश असतो, जो थेट कर्करोग पेशींवर परिणाम करतो. ही थेरपी अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि आण्विक औषधोपचार यांचं एकत्रित रूप मानलं जातं.

टाटा मेमोरियल सेंटरने जून २०२५ मध्ये देशात प्रथमच हाय डोस एमआयबीजी थेरपी रुग्णावर वापरली असून ती यशस्वी ठरली आहे. ही थेरपी एका पाच वर्षांच्या मुलावर न्यूरोब्लास्टोमा या कर्करोगावर करण्यात आली. विशेष म्हणजे, ही थेरपी १५ ते २० मिलीक्युरिज प्रति किलो वजनाप्रमाणे दिली जाते आणि यासाठी विशेष संरक्षित कक्ष तयार करण्यात आले होते, जेथे रेडिएशनचा प्रसार नियंत्रित ठेवला जातो. भारतात दरवर्षी सुमारे १५०० ते २००० बालकांना न्यूरोब्लास्टोमा होतो, यापैकी बहुसंख्य रुग्ण हे प्रगत टप्प्यावर निदान होतात. पारंपरिक उपचार पद्धती अनेक वेळा परिणामकारक ठरत नाहीत. अशा स्थितीत एमआयबीजी थेरपी आशेचा किरण ठरत आहे. यामुळे रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते व ट्यूमरमध्ये लक्षणीय घट दिसून येते.

या थेरपीसाठी टाटा मेमोरियल सेंटरने खास आण्विक औषध विभागात संरक्षित उच्च रेडिएशन कक्ष तयार केला आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएइ) आणि बाबा अणु संशोधन केंद्र यांच्या तांत्रिक सहकार्याने हे यश शक्य झाले आहे. टाटा रुग्णालय हे देशातील एकमेव केंद्र आहे ज्यांच्याकडे हाय डोस एमआयबीजी थेरपीसाठी पूर्ण संरक्षित रेडिएशन कक्ष, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम, आणि आवश्यक सर्व सुरक्षा उपाय आहेत. ही थेरपी अत्यंत खर्चिक असली तरी टाटा मेमोरियल सेंटरने अनेक सामाजिक संस्था आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्याने गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात ही सेवा पुरवली आहे.

दरमहा अशा ५ते ६ रुग्णांवर ही थेरपी करण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. एमआयबीजी थेरपी यापूर्वी अमेरिका, जपान, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये वापरली जात होती. भारतात प्रथमच यशस्वीपणे ही थेरपी राबवणे हे भारतीय आण्विक औषधोपचार क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे भारत आता आण्विक औषध उपचार पद्धतीत जागतिक स्तरावर नावारूपाला येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यशामुळे महाराष्ट्रातील अन्य वैद्यकीय शिक्षण संस्था आणि कर्करोग रुग्णालयांना आण्विक औषध उपचार केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही भविष्यात अत्याधुनिक कर्करोग उपचार सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टाटा मेमोरियल सेंटरचा हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग म्हणजे भारताच्या कर्करोगावरील लढ्याचा एक मैलाचा दगड ठरत आहे. वैज्ञानिक, वैद्यकीय आणि सामाजिकदृष्ट्या ही एक अभूतपूर्व उपलब्धी असून, भविष्यात बालकर्करोगावर मात करण्यासाठी भारत आता अधिक सशक्तपणे सज्ज झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.