मुंबई : टॅक्सीच्या किमान भाडय़ात तीन रुपयांनी, तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढविण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली होती. ही भाडेवाढ उद्या, शनिवारपासून लागू होणार आहे. एनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. शनिवारपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार रिक्षाच्या भाडय़ात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये तर, टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे शनिवारपासून २१ रुपयांवरून २३ रुपये, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे.

रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर प्रवास करण्यासाठी २७ रुपयांऐवजी २९ रुपये आणि टॅक्सीसाठी ३२ रुपयांऐवजी ३५ रुपये द्यावे लागणार आहेत. रिक्षामधून दिवसा पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी ७१ रुपयांऐवजी ७७ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटर प्रवासासाठी ८९ रुपयांऐवजी थेट ९६ रुपये द्यावे  लागणार आहेत. तर, दिवसा दहा किलोमीटर प्रवासासाठी १४२ रुपयांऐवजी १५३ रुपये भाडे द्यावे लागेल.

बेस्टचा प्रवास स्वस्त..

काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे. पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी  ८५ ऐवजी ९३ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटरसाठी १०६ ऐवजी ११७ रुपये द्यावे लागणार आहेत. सध्या बेस्टच्या साध्या बसमधून पाच किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी पाच रुपये आणि वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी सहा रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीपेक्षा बेस्टचा प्रवास स्वस्त आहे.