मराठवाडय़ातील कुटुंबाचा सामाजिक बांधिलकीचा नवा सेतू
विद्यादान करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या सुनील बुधवंत या ३९ वर्षांच्या शिक्षकाचा आजारपणात ‘ब्रेन डेड’ झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुनीलचे अवयवदान करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला. एका शिक्षकाच्या अवयवदानामुळे चौघा रुग्णांना जीवनदान मिळाले. मराठवाडय़ातून अवयवदान चळवळीला मिळालेले हे आगळे बळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मेंदू मृत झाल्यामुळे गेल्या महिन्यात राम मगर यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर औरंगाबादमध्ये सुनील बुधवंत यांच्या नातेवाईकांनी हृदय, मूत्रपिंड, यकृत तसेच नेत्रदान करून सामाजिक बांधिलकीचा नवा सेतू उभारला आहे. सुनीलचे हृदय मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील एका २७ वर्षांच्या तरुणामध्ये धडधडत आहे. डॉ. अन्वय मुळे यांनी ही हृदयप्रत्यारोपणाची आठवी यशस्वी शस्त्रक्रिया केली. याशिवाय पुण्यातील रुबी रुग्णालयात एका रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली तर औरंगाबाद येथील धूत व बजाज रुग्णालयातील दोन रुग्णांना मूत्रपिंड बसविण्यात आल्याचे आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रदान करण्यात आल्याचे औरंगाबाद विभागीय प्रत्यारोपण केंद्राचे प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले.
एकीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अवयवदानाची चळवळ म्हणावी तशी रुजलेली नाही. सामाजिक रूढीपरंपरांमुळे या रुग्णांचे नातेवाईक अवयवदानासाठी फारसे पुढे येत नाहीत. तसेच त्याबाबत जाणीव व जनजागृती निर्माण करण्यात शासन कमी पडते, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील हे दुसरे अवयवदान असून यामुळे अवयवदान चळवळ रुजण्यास मोठी मदत होईल, असे डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.सुनील यांचा भाऊ डॉ. राजीव यांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले.