scorecardresearch

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण निविदेच्या जंजाळात!

कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुपदरीकरणाच्या कामाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पातही केली.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण निविदेच्या जंजाळात!
प्रतिकात्मक छायाचित्र

मुहूर्त हुकला; निविदा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे विलंब

कोकणात आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प सध्या निविदेच्या जंजाळात अडकला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वेच्या हद्दीतील दुपदरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन झाले होते. मात्र त्यानंतर या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया काही तांत्रिक गोष्टींमध्ये अडकल्याने अद्याप या मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. हे काम मे महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते, मात्र आता हे काम कधी सुरू होणार, याबाबत साशंकता आहे.

कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुपदरीकरणाच्या कामाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पातही केली. कोकणात जाणारा पनवेलपासूनचा मार्ग एकेरी असल्याने या मार्गावर अपघात किंवा दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यास पूर्ण मार्ग बंद होतो. तसेच एकपदरी मार्गामुळे या मार्गावर जास्त गाडय़ा चालवणेही शक्य होत नाही. त्यामुळे दुपदरीकरणाचा प्रकल्प या मार्गासाठी महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पातील मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोह्य़ापर्यंतचे दुपदरीकरण २०१६च्या अखेरीस पूर्ण होणार आहे. या हद्दीतील नागोठणे ते रोहा या १३ किलोमीटरच्या अंतरातील काम होणे शिल्लक आहे.

कोकण रेल्वेच्या हद्दीत मात्र अद्यापही दुपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. नोव्हेंबर महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत रोहा ते वीर या ४७ किलोमीटरच्या कामाचे भूमीपूजन झाले होते. त्यानंतर या कामासाठीची निविदा प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. या प्रकल्पाचे काम मे महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाकडून या वर्षांच्या सुरुवातीला देण्यात आली होती. आता जून महिना अर्धा उलटून गेला, तरी या प्रकल्पाची सुरुवात झालेली नाही. या कामाची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेतील सूत्रांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त होऊनही अजूनही या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र, हे काम कधीपासून सुरू होईल, याबाबत सध्या तरी काहीच ठोस सांगता येणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेच्या हद्दीत मात्र अद्यापही दुपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. नोव्हेंबर महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत रोहा ते वीर या ४७ किलोमीटरच्या कामाचे भूमीपूजन झाले होते.

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-06-2016 at 01:16 IST

संबंधित बातम्या