Technical glitches in university exams akp 94 | विद्यापीठाच्या परीक्षेत तांत्रिक घोळ; परीक्षा होताच निकाल हाती, विद्यार्थ्यांचा गोंधळ | Loksatta

विद्यापीठाच्या परीक्षेत तांत्रिक घोळ; परीक्षा होताच निकाल हाती, विद्यार्थ्यांचा गोंधळ

विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्या वेळी निकाल मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याएवढे गुण मिळूनही नापास शेरा मिळाल्याने गोंधळात अधिक भर पडली.

विद्यापीठाच्या परीक्षेत तांत्रिक घोळ; परीक्षा होताच निकाल हाती, विद्यार्थ्यांचा गोंधळ
मुंबई विद्यापीठ

परीक्षा होताच निकाल हाती, विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई : करोनाकाळात सुरू झालेल्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीला दीड वर्ष उलटले तरी अद्यापही मुंबई विद्यापीठात तांत्रिक घोळांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पीएचडी पूर्वपरीक्षा (पेट) होताच काही क्षणातच विद्यार्थ्यांना निकाल प्राप्त झाला. त्यात बहुतांशी विद्यार्थ्यांना नापास शेरा मिळाल्याने गोंधळ उडाला.

मुंबई विद्यापीठात १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पेट परीक्षेसाठी जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या या परीक्षेत पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. मानवविद्याशाखेच्या विविध विषयांतील एक हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होताच काही क्षणातच विद्यार्थ्यांना निकाल प्राप्त झाले. निकालाची कोणतीही कल्पना दिली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

विशेष म्हणजे काहींना निकाल मिळाले आणि काहींना मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्या वेळी निकाल मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याएवढे गुण मिळूनही नापास शेरा मिळाल्याने गोंधळात अधिक भर पडली. अखेर विद्यापीठाने विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून ती तांत्रिक अडचण असल्याचा खुलासा केला.

हा निकाल ग्राह्य धरला जाणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे काही क्षणासाठी विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले. ऑनलाइन परीक्षा आता सवयीच्या होऊनही तांत्रिक अडचणी येणे सुरूच आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

– धनराज कोहचाडे, अधिसभा सदस्य

तांत्रिक अडचणींमुळे हा निकाल विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. काही विद्यार्थ्यांना तो मिळाला, काहींना नाही. हा निकाल पूर्णत: चुकीचा असून विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे असे आम्ही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून कळवले आहे. लवकरच अधिकृत निकाल जाहीर केला जाईल.

– डॉ. विनोद पाटील, संचालक परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2021 at 01:32 IST
Next Story
रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक