लघुसंदेश येऊनही वेतन खात्यात जमा नाही; मुंबै बँकेवर ठपका
शिक्षकांचे वेतन देण्याची जबाबदारी घेणाऱ्या मुंबै बॅंकेने पहिल्याच प्रयत्नात घोळ घातला आहे. २९ जुलैलाच वेतन जमा झाल्याचे संदेश बॅंकेकडून शिक्षकांना पाठवण्यात आले. मात्र शिक्षकांनी व्यवहारासाठी अन्य बॅंकांना धनादेश दिले ते परत आले तेव्हा वेतन जमा झालेलेच नाही, असे लक्षात आले. काही शिक्षकांच्या खात्यावर वेतनापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. तर काही ठिकाणी एका शिक्षकाचे वेतन अन्य शिक्षकाच्या खात्यावर वळते करण्यात आले. संमतीशिवाय मुंबै बॅंकेने खाती उघडल्याचा आरोप केला आहे.
लेखी तक्रार दिल्यानंतर या शिक्षकांचे वेतन खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच चेंबूरच्या शाळेतील एका शिक्षकाच्या खात्यावर त्याच्या वेतनापेक्षा जादा म्हणजे ४२८१ रुपये जमा झाल्याचे निर्दशानास आले आहे. याबाबत बँकेकडे चौकशी केल्यानंतर तांत्रिक त्रुटीमुळे एका शिक्षकाचे वेतन दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यावर पडल्याची माहिती पुढे आली.
मुंबईतील सर्व शिक्षकांचे वेतन आतापर्यत युनियन बँकेर्माफत करण्यात येत होते. परंतु जुलै महिन्यापासून हे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्यात येईल असल्याचा आदेश शासनाने काढला. ऑगस्ट महिना आल्यानंतर या शिक्षकांना आपली खाती परस्पर मुंबै बँकेमध्ये उघडण्यात आली असून त्यामध्ये जुलै महिन्याचे वेतन जमा झाल्याचे समजले .मालाड येथील बाफना कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक दिलीप देशमुख यांचे त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही कागदपत्रे न घेता मालाड येथील मुंबई बँकेमध्ये खाते उघडण्यात आले.
महाविद्यालयाने माझी कागदपत्रे माझ्या परवानगीशिवाय बँकेला दिली असा होतो का? असे असेल तर हे बेकायदेशीर आहे. असे दिलीप देशमुख यांनी सांगितले आहे. वेतन राष्ट्रीयकृत बँकेतूनच करावे यावर आम्ही ठाम आहोत. या संर्दभात रविवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे शिक्षकभारतीचे जालिंदर सरोदे यांनी सांगितले आहे.