मुंबई : गेल्या बारा वर्षांपासून चर्चेत असलेल्या ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. या कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर दहा तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याणबरोबरच सीएसएमटीपासूनही लोकल गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. मार्च २०१९ ही अंतिम मुदत असताना त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. आता डिसेंबर २०२१ किंवा पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत तरी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने ठेवले आहे.

या मार्गिकांची रूळ जोडणीसह अन्य तांत्रिक कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार असून त्यासाठी येत्या काही महिन्यांत मोठे मेगा ब्लॉक घ्यावे लागणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. येत्या रविवारी २६ सप्टेंबरला दहा तासांचा मेगा ब्लॉक दिवा ते ठाणेदरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. या ब्लॉकबरोबरच ऑक्टोबर महिन्यात पाच ब्लॉक घेण्यात येणार असून ते रात्री घेण्यात येतील. तर नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही १० तासांहून अधिक कालावधीचे मोठे मेगा ब्लॉक होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten hour mega block on the central railway on sunday akp
First published on: 22-09-2021 at 01:45 IST