धारावी पुर्नविकास प्रकल्प अदाणी समूहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. धारावीचा पुर्नविकास अदाणी समूहाच्याऐवजी सरकारनं करावी, अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे.
धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरूवात झाली. बीकेसी येथील सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ ८ जवळ हा मोर्चा थांबला आहे. येथे सभेला सुरूवात झाली आहे. या सभेला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या मोर्चात खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सहभागी झाले आहेत.
मोर्च्यातील मागण्या काय आहेत?
- धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीत पुर्नवसन करा.
- निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या. ‘टीडीआर’साठी सरकारनं स्वत:ची कंपनीची नेमणूक करावी.
- पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत द्या.
- धारावीचं नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करा.
- प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी ‘मास्टर प्लान’ आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या.
- शाहू लेबर कॅम्पमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचा घरे द्या.
- अदाणी हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्यानं म्हाडा, सिडको, प्राधिकरणाकडून ‘बीडीडी’च्या धर्तीवर पुर्नविकास करा