नवीन रेल्वे स्थानकासाठी आरक्षणबदल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या १४.८३ एकर भूखंडावरील आरक्षणात बदल केला आहे. याबाबतचा आदेश जारी करताना मनोरुग्णालयाच्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा आणि सुसज्ज रुग्णालय बांधून देण्याबाबत कोणतीही लेखी हमी नगरविकास विभागाने आरोग्य विभागाला दिलेली नाही. त्यामुळे मनोरुग्णालयाचे भवितव्य अधांतरी आहे.

मनोरुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना नव्या मनोरुग्णालयांची नितांत गरज आहे. त्यामुळे विस्तारित रेल्वे स्थानकासाठी जागा हवी असल्यास आरोग्य विभागाला मनोरुग्णालयासाठी जागा देण्याबरोबरच सुसज्ज मनोरुग्णालय बांधून देणे, तसेच जिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय बांधून देण्याची स्पष्ट भूमिका (पान ११ वर) (पान १ वरून) आरोग्य विभागाने घेतली होती. मनोरुग्णालयाच्या जागेचे आरक्षण बदलून ही जागा रेल्वे स्थानक तसेच स्मार्ट सिटीच्या नावे ठाणे पालिकेला देण्यापूर्वी आरोग्य विभागाला या जागेचा मोबदला बाजारभावाने मिळाला पाहिजे, तसेच सुसज्ज मनोरुग्णालयाची इमारतही बंधून मिळाली पाहिजे, अशी भूमिका मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अहवालात घेतली. तथापि, नगरविकास विभागाने मनोरुग्णालयाचे आरक्षण बदलण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेत त्याबाबत कोणताही उल्लेख नाही.

ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा येणारा ताण लक्षात घेऊन ठाणे व मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होते. आरोग्यमंत्री असताना शिंदे यांनी नियोजित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा घेताना त्याबदल्यात ठाणे येथे अन्यत्र १४.८३ एकर जागा देऊन सुसज्ज मनोरुग्णालय बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आल्यानंतर ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवरील आरक्षण बदलाला वेग येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या आठवडय़ात सर्व संबंधितांची बैठक झाली. १८ फेब्रुवारी रोजी राज्याच्या नगरविकास खात्याने मनोरुग्णालयाच्या भूखंडावरील आरक्षण बदलाची अधिसूचनाही जारी केली. हा भूखंड याआधी ठाणे मनोरुग्णालय, पंपींग स्टेशन, पालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यासाठी आरक्षित होता. नव्या अधिसूचनेनुसार, आता हा भूखंड रेल्वे स्थानक, बस टर्मिनस आणि १२, १८ व २४ मीटर रुंदीचे तीन सार्वजनिक रस्ते यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ठाणे मनोरुग्णालयाची एकूण ६६ एकर जागा असून, यातील १४.८३ एकर जागेवरील आरक्षणात बदल करण्यात आला आहे. १९०१ सालापासून हे रुग्णालय अस्तित्वात असून, एका दानशूर व्यक्तीने दिलेल्या जमिनीवर हे रुग्णालय उभे आहे. यातील साडेचार एकर जागेवर अतिक्रमण झाले असून, तिथे ९९३ झोपडय़ा आहेत. त्यातील ७२३ पात्र ठरविण्यात आल्या असून, याशिवाय कर्मचारी वसाहती व रुग्णालयाच्या इमारती आहेत. मनोरुग्णालयात एकूण १८५० खाटा मंजूर असून त्यापैकी ८०० खाटा स्त्री मनोरुग्णांसाठी आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मानसिक आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता ठाणे मनोरुग्णालयाचे बळकटीकरण व विस्तारासाठी शासनाने निधी देण्याची गरज असताना रेल्वे स्थानकाच्या नावाखाली मनोरुग्णारुग्णालयाच्या जागेवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

मनोरुग्णालयाच्या जागेवर आरक्षण आणण्यात आले असले तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. आरोग्य विभागाची जेवढी जागा जाणार आहे तेवढय़ा जागेवर आम्हाला नवीन सुसज्ज मनोरुग्णालय बांधून मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. सरकारनेही आमची भूमिका मान्य केली असून सुसज्ज मनोरुग्णालय बांधून मिळेल, अशी आशा आहे.

-डॉ. प्रदीप व्यास , प्रधान सचिव, आरोग्य

ठाणे मनोरुग्णालयाच्या आरक्षणबदलाची कोणतीही माहिती मला नाही. यासंदर्भातील कोणताही विषय माझ्यासमोर आलेला नाही. केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मनोरुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशावेळी ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेचे आरक्षण रेल्वे स्थानकासाठी बदलले जाणार असेल तर आरोग्य विभागाला मनोरुग्णालयाची सुसज्ज इमारत संबंधित विभागांनी बांधून देणे गरजेचे आहे. शिवाय, जागेचा मोबदलाही मिळायला हवा.

-राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mental hospital land given for new railway station in thane zws
First published on: 21-02-2020 at 04:14 IST