एखाद्या पवित्र प्राण्यावरून सामाजिक तणाव निर्माण होण्याच्या घटना नव्या नाहीत. हल्ली गाय हा प्राणी – नव्हे, माता – याबाबतीत केंद्रस्थानी आहे. मुंबईत काही वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या तणावासच नव्हे, तर अगदी दंगलीस कारणीभूत ठरला होता पवित्र कुत्रा. मोठी रंजक कथा आहे ती. अव्वल इंग्रजी आमदनीतली.
तो साधारणत १८००चा काळ. मुंबईत एका सरकारी कर्मचाऱ्याला एक भटका कुत्रा चावला. आता यात काय विशेष? असंख्य वेळा असे प्रकार घडलेले आहेत. तेव्हाही घडत होते. आताही घडत आहेत. पण त्या भटक्या कुत्र्याला हे माहीत नव्हते, की आपण ज्याचा चावा घेतला आहे तो एक तर सरकारी कर्मचारी आहे आणि त्यातही तो गोरा आहे. त्या ब्रिटिश कर्मचाऱ्याचा कुत्रा चावून मृत्यू झाला. पण मरता मरता त्याने कुत्र्यांवर सूड उगवला. मुंबईचे वर्णनकार माडगावकर सांगतात, की ‘त्याने मरते समयीं सरकारांत पुष्कळ द्रव्य ठेवून असा अर्ज केला कीं, मुंबई शहरांत जीं रस्तोरस्तीं कुत्रीं फिरून लोकांस उपद्रव करितात, व येणाऱ्याजाणाऱ्यांच्या आंगावर धांवून येतात, त्यांस प्रतिवर्षी आपल्या अनामत ठेवलेल्या द्रव्याचें जें व्याज येईल तें खर्च करून मारून टाकावीं.’
ही वहिवाट पुष्कळ वर्षे चालत आली. कुत्रेमारू लोक कुत्रे मारायची. पोलीस मास्तरास नेऊन दाखवायची. त्या दर कुत्र्यामागे त्यांना अर्धा रुपया मिळे.
पुढे पोलीस मास्तराने असा हुकूम काढला, की ते मेलेले कुत्रे घेऊन येण्याचे कारण नाही. लोकांनी फक्त मेलेल्या कुत्र्याच्या शेपटय़ा घेऊन याव्यात. तर लोक अशी तनखोरी करायला लागले, की कुत्र्याचे शेपूट कापून घ्यायचे आणि कुत्रा सोडून द्यायचे.
भटक्या कुत्र्यांची ही अशी कत्तल तेव्हाच्या काही भूतदयावादी लोकांना पाहवली नाही. १८३०च्या सुमाराला सर जमशेटजी जिजीभाई, शेट मोतीचंद खेमचंद आदी पारशी आणि दक्षिणी महाजन मंडळींनी मिळून सरकारला अर्ज केला. कुत्री अशी मारू नयेत. ती धरून दूर सोडावीत. तेव्हापासून कुत्रेमारू लोक कुत्रेधरू बनले. अर्धा रुपयाच्या आशेने कुत्री धरून नेऊन लागले.
आता पारशी लोकांमध्ये कुत्रा हा पवित्र प्राणी मानतात. पण या कुत्रेधरू लोकांस त्याचे काय? भटकी काय आणि पाळीव काय, कुत्रा दिसला पकडायचा नि घेऊन जायचा. माडगावकर सांगतात, ते ‘कोणाच्या ओटीवरून धरून नेत, कोणाच्या वाडय़ांत शिरून धिंगामस्ती करून कुत्रे घेऊन जात.’ त्यामुळे पारशी लोक संतापले होते. त्याचा भडका उडाला १८३२च्या जून महिन्यात. एके दिवशी काही कुत्रेधरू लोकांनी पारशी वाडय़ांत शिरून कित्येकांची पाळीव कुत्री धरून नेली. त्या वेळी ‘पारशांची आणि त्यांची थोडी लटापटी झाली.’ त्यानंतर पारशी लोकांनी एकत्र येऊन या विरोधात हरताळ पाळायचे ठरविले. इंग्रज लोकांचे खाणे बंद होईल असे करावे अशी त्यांची मसलत होती.
७ जून रोजी ‘पारशी लोकांचे बबरजी, पाणके आदिकरून बहुतेक हलक्या प्रतीच्या’ पाच-पन्नास लोकांनी बाजार बंद पाडला. कुलाब्याला सोल्जर व इतर इंग्रज लोकांस रोटी व पाव जात असे ते या श्वानमित्रांनी बंद केले. ‘कित्येक खाटकी लोक यांस अनुकूल नव्हते.’ तर या आंदोलकांनी त्यांच्याकडचे मांस घेऊन फेकून दिले. किरिस्तावांकडचे पाव हिसकावून त्यांना हाकलून दिले. सकाळी दहा-अकरापर्यंत त्यांची धिंगामस्ती चालली होती. मोठी दहशत माजवली त्यांनी. एवढी की सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कोर्टात निघाले होते, तर त्यांची गाडी अडवून त्यात कचरा आणि एक-दोन मेलेल्या घुशी टाकल्या. कोणाचे काही ऐकेनात ते.
‘जे अडाणी लोक आपल्या गुरमींत होतें तें शुद्धीवर येईनात. मग टौनमेजर (टाऊन मेजर) यांनी कुलाब्याहून दोन-तीन वाजतांनां गोऱ्या लोकांची पलटण आणून उभी केली. अशा मसलतीनें कीं, तसाच प्रसंग गुजरला असतां बार सोडण्याचा हुकून करावा.’ हे पाहिल्यानंतर मात्र दंगेखोरांचे अवसान गळाले. त्यांची पळापळ सुरू झाली. नंतर त्यांतील कित्येकांस धरून कैद करण्यात आले. ‘त्यांस कोणास दोन, कोणास तीन वर्षांच्या टेपो देऊन शिक्षा’ झाली.
माडगावकर सांगतात, ‘ह्य़ा दंग्यांत कांहीं खून झाला नाहीं ही एक गोष्ट पारशी लोकांच्या दंग्यांत सांगाया जोगी आहे..’
माहीतगार