मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना नाव वापरण्यास घालण्यात आलेली तात्पुरती बंदी किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वादातील अर्धी लढाई जिंकल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, दोन्ही गटांनी पर्यायी नावांबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

ठाकरे व शिंदे यांनी आपल्या गटाच्या वरिष्ठ नेत्यांची रविवारी बैठक बोलाविली असून त्यात पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांनी पक्षाचे पर्यायी नाव व निवडणूक चिन्ह याबाबत विचार सुरू केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कायम राहिले असते आणि शिवसेनेने विजय मिळविला असता तर शिंदे गटाला मोठा धक्का बसला असता. त्यातून खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच हे सुचित झाले असते. हे टाळण्यासाठीच अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्ह गोठविले जावे यासाठी शिंदे गटाची सारी धडपड सुरू होती. शिंदे गटाच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिंदे गटाने अर्धी कायदेशीर लढाई जिंकल्याची प्रतक्रिया शिंदे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली.

ईडी, सीबीआयनंतर निवडणूक आयोग, शिवसेनेची टीका

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली   असून निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहे, असा सवाल केला आहे. ईडी, सीबीआय नंतर आयोगाची वेठबिगारी सुरू झाली असल्याची टीका करीत सावंत म्हणाले,  सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे.  शिवसेना हे आमच्या बापाचे नाव आहे. ते आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. या परिस्थितीतून जात असताना शिवसेना अधिक मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही,  असे सावंत यांनी स्पष्ट केले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी,खरी शिवसेना आमचीच असल्याचा व धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच असल्याचा दावा केला. बहुसंख्य आमदार, खासदार व पदाधिकारी हे आमच्या बाजूने आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.

आज दोन्ही गटाच्या बैठका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसेना  (बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र )अशी काही पर्यायी नावे आणि काही निवडणूक चिन्हांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची रविवारी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.