मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव साठा मिळून ४८ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. मात्र जून महिना निम्मा ओसरला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आणखी १५ दिवस वाट पाहून जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा आटत आहे. भातसा व उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे सातही धरणांत मिळून सध्या राखीव साठ्यासह १५.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरणारा असला तरी महानगरपालिका प्रशासनाचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
सातही धरणांत मिळून १ लाख २८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर ऊर्ध्व वैतरणा धरणातून ७५ हजार दशलश लिटर आणि भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष लिटर अधिक पाणी मिळणार आहे. त्यामुळे २ लाख ६१ हजार ७३१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा १५.६९ टक्के आहे. पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. येत्या पंधरा दिवसांत पावसाला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात धरणांतील पाण्याची पातळी वाढण्यास काही दिवस लागू शकतात. त्यामुळे जून अखेरीस सर्व बाबींचा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
सातही धरणातील पाणीसाठा …..१ लाख २८ हजार ८७३ दशलक्ष लीटर…….८.९० टक्के
राखीव साठा…….१ लाख ५० हजार दशलक्ष लीटर …..
एकूण पाणीसाठा ….२ लाख ५० हजार ६९१ दशलक्षलीटर ……..१५.६९ टक्के