मुंबईचे शांघाय करण्याच्या बाता गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्या तरी प्रत्यक्षात विकासाचे पुरते बारा वाजले आहेत. हे कमी ठरावे म्हणून महापालिकेकडून प्रस्तावित विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचे काम केवळ ‘अर्बन प्लॅनर’ नसल्यामुळे आणखी सहा महिने रखडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वी १९६४ साली मुंबई शहराचा पहिला विकास आराखडा महापालिकेकडून तयार करण्यात आला. यानंतर दुसरा विकास आराखडा १९८१ साली झाला. मात्र ही योजना १९९४ साली प्रत्यक्षात आली.आता २०१४ ते ३४ सालासाठीचा विकास आराखडा महापालिकेने एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने तयार केला असून हा प्रस्तावित आराखडा जनता व लोकप्रतिनिधींपुढे हरकती व सूचनांसाठी आणणे अपेक्षित आहे. मात्र या प्रस्तावित विकास आरखडय़ाचा अभ्यास करून विश्लेषण करण्याची क्षमता पालिका अभियंत्यांमध्ये नसल्यामुळे ‘अर्बन प्लॅनर’कडून हा आराखडा तपासणे आवश्यक आहे.
पालिकेकडे या पदावर एकही अधिकारी नसल्यामुळे त्यांनी नुकतीच याबाबत जाहिरात दिली असून जुलैपर्यंत ही भरती झाल्यानंतर आराखडय़ाची तपासणी होऊन तो शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आराखडय़ात उद्याने, मैदाने, प्रतिचौरस फूट मोकळी जागा, मुंबईचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन निवासी व अनिवासी जागा किती असावी, रुग्णालये, रस्ते, मलनिस्सारण प्रकल्प, पाणीपुरवठा आदींची मांडणी करण्यात आली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या व उपलब्ध क्षेत्रफळ लक्षात घेऊन अंतिम प्रस्तावित विकास आराखडा पालिकेने तयार केला असला तरी यातील प्रत्येक आरक्षित गोष्टीसाठी उपलब्ध केलेले क्षेत्रफळ तसेच मुंबईचे वाढलेले क्षेत्रफळ लक्षात घेता या साऱ्याचा अभ्यास करणे व त्यातील त्रुटी शोधणे हे पालिका अभियंत्यांना शक्य नाही.
मुंबईतील ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या संस्थेने या विकास योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.