Explain Surgical Strike and Air Strike Difference २२ एप्रिलच्या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली. धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. या भ्याड आणि निषेधार्ह हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाब उघड झाली. यानंतर भारत पाकिस्तानच्या विरोधात काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं होतं. ६ मेच्या रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमधली काही ठिकाणी आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर या ठिकाणी हवाई हल्ला केला. हा एअर स्ट्राईक होता की सर्जिकल स्ट्राईक? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आपण जाणून घेऊ हे दोन्ही एकच आहेत का? फरक असला तर नेमका काय? ते पण समजून घेऊ.
६ तारखेच्या रात्री उशिरा राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर
६ मेच्या रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधले काही भाग या ठिकाणी असलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. इतकंच नाही तर अत्यंत नेमक्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला. एकाही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला भारताने या हल्ल्यात मारलं नाही. अत्यंत नेमके पणाने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. अशात चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकची. आपण समजून घेऊ या दोन्ही प्रक्रियांबाबत.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक हा अत्यंत नेमकेपणाने केला जातो. एखाद्या डॉक्टरला सर्जरी करण्याआधी अत्यंत सूक्ष्म पद्धतीची काळजी घ्यावी लागते म्हणजेच रुग्णाची एखादी नसही दुखावली जाऊ नये इतकी सूक्ष्म पद्धतीने काळजी घेतो. सर्जिकल स्ट्राईक करताना याच प्रकारची काळजी घेतली जाते. भारताने जो हवाई हल्ला करुन नेमकेपणाने एअर स्ट्राईक केला तो सर्जिकल स्ट्राईकचाच एक भाग आहे. अत्यंत बारकाईने आणि नेमकेपणाने हल्ला जो हल्ला केला जातो त्याला सर्जिकल स्ट्राईक असं म्हटलं जातं. सर्जिकल स्ट्राईक करताना आधी टार्गेट निश्चित केलं जातं. त्यानंतर ते उद्ध्वस्त करण्यासाठी नेमकेपणाने आणि सगळी काळजी घेऊन हा हल्ला केला जातो.

News About Surgical Strike and Air Strike
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक यामध्ये खरंच काही फरक आहे का? (फोटो-ANI)

एअर स्ट्राईक म्हणजे काय?

एअर स्ट्राईक म्हणजे नुसता हवाई हल्ला. ज्यात कार्पेट बॉम्बिंग केलं जातं. पाकिस्तानसह या आधी झालेल्या युद्धात भारताने कार्पेट बॉम्बिंग केलं होतं आणि पाकिस्तानातील विमानतळाची धावपट्टी कार्पेट बॉम्बिंगने उद्ध्वस्त केली होती. एका मागोमाग एक बॉम्ब हल्ले केले गेले आणि धावपट्टीच उद्ध्वस्त केली जेणेकरुन शत्रूची लढाऊ विमानंच टेक ऑफ करु शकणार नाहीत तो झाला एअर स्ट्राईक. एअर स्ट्राईक वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक या दोहोंमध्ये नेमकेपणा असतो, बारकावे हेरुन हा हल्ला केला जातो. या दोहोंमध्ये अत्यंत थोडा फरक आहे. जो या दोन उदाहरणांवरुन आपल्याला लक्षात येतो.