मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात १ एप्रिलपासून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर विकासकामे आता नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या कचाटय़ात सापडली आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या कामांवर असलेली स्थगिती शिंदे- फडणवीस सरकारने अखेर गुरुवारी उठविली. मात्र ही सर्व कामे पालकमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच करावीत, असे आदेश नियोजन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सत्तांतरानंतर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांबाबतचा आढावा घेतल्यानंतर तसेच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर ही स्थगिती उठविण्यात आली आहे. मात्र यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आणि नव्याने हाती घेण्यात येणारी सर्व कामे पालकमंत्र्यांच्या मान्यतेनेच करावीत असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांची  कोंडी होणार असून शिंदे गटातील पालकमंत्री कामे अडवून ठेवण्याची धास्ती त्यांना आहे.