मुंबई: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील भूसंपादन धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, गुजरातमध्ये वेगाने भूसंपादन झाल्याने येथील कामांना गती दिली जात असून पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलिमोरा मार्गावर पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम रेल्वेच्या विविध विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल सांगताना महाराष्ट्रातील भूसंपादन पाहता हे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरत ते बिलिमोरा पहिला टप्पा २०२६ मध्ये सुरू करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट केले. हा मार्ग ५० किलोमीटरचा असून बुलेट ट्रेनमुळे १५ मिनिटांत अंतर पार करता येणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण ४३२.६७ हेक्टर जमिनीची गरज असून आतापर्यंत नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सरकारी व खासगी मिळून १३४.३१ हेक्टरच जमीन घेता आली आहे. त्यातही खासगी जमिनींपैकी फक्त ५५ हेक्टरचाच समावेश आहे. त्यामुळे राज्यात ३१ टक्केच भूसंपादन झाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. ठाणे, पालघर जिल्ह्य़ाबरोबरच अंधेरीतील काही भागही लागणार आहे. ठाणे,पालघर जिल्ह्य़ातील ९५ गावे प्रकल्पबाधित आहेत.