मुंबई आणि परिसरातील म्हणजेच मुंबई महानगर भागातील भविष्यातील वाहतुकीच्या आराखड्याबाबत एका कार्यशाळेचे आयोजन एमएमआरडीएने म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी केले होते. यानिमित्ताने मुंबई महानगर भागातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे घटलेले प्रमाण यावर चिंता व्यक्त करण्यात आली. हे प्रमाण वाढवण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था भक्कम करण्याकडे पावलं उचलली जात असल्याचं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधतांना वाढत्या इंधन दरवाढीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्किल भाषेत केंद्र सरकारवर टीका केली. इंधन दरवाढ ही सर्वसमान्यांच्या भल्यासाठीच केली असल्याचा टोला यावेळी मुख्यमंत्री यांनी लगावला. “कोणालाही वाहतुक कोंडीत गाडी चालवायची आवड नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांचा टक्का घसरत आहे, हे केंद्र सरकाराच्याही लक्षात आलं आहे, म्हणून इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे, हे आपल्या भल्यासाठी होत आहे. तुम्हाला वाटतंय की मी टीकात्मक बोलतोय, पण तुम्ही सांगा, परवडलं नाही की लोकं सार्वजनिक वाहतुकीकडे लोकं वळतील, चांगल्या हेतुनं इंधन दरवाढ होत आहे हे आपण लक्षातच घेत नाहीये “, असं मुख्यमंत्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर आणि राज्यात चांगले रस्ते असण्याची आवश्यकता स्पष्ट केली. यामुळे राज्यात विकास वेगाने होईल अशी आशा व्यक्त केली. तसंच मुंबई महानगरमधील वाहनांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. एमएमआरडीएच्या या कार्यशाळेत मुंबई महानगरमधील भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीबाबत चर्चा होत दिशा निश्चित केली जाणार आहे.