मुंबई : समृद्धी हा शेतकऱ्यांना समृद्ध करणारा महामार्ग आहे. शेतकऱ्यांसह राज्याला समृद्ध करणाऱ्या या महामार्गाचा शेवटचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. समृद्धी महामार्गावरील शिर्डी -भरवीर ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळय़ात मुख्यमंत्री बोलत होते.

शिर्डी पथकर नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आता शिर्डी-भरवीर अंतर ४० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. नागपूर-भरवीर हे अंतर सहा तासांत पार करता येणार आहे. सध्या भरवीर – इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी -आमणे (ठाणे) या शेवटच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. शेवटचा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. त्यानंतर तात्काळ हा टप्पा सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
arvind kejriwal
मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ

दुसरा टप्पा असा..

मुंबई-नागपूर अशा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील शिर्डी-भरवीरदरम्यानचा ८० किमीचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यात सात मोठे पूल, १८ छोटे पूल, ३० वाहन भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, तीन पथकर नाके, तीन प्रवेश निर्गमन मार्ग आदींचा समावेश आहे.

शिंदेंची ठाकरेंवर टीका

विरोधकांनी समृद्धी महामार्गाला कसा विरोध केला, हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘‘आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही शब्दाला जागतो, आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. घरात बसून आम्ही चर्चा करत नाही’’, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने आमच्या सरकारचा मार्ग मोकळा केला आणि आज समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.

नागपूर -भरवीर प्रवासासाठी पथकर किती?

समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पथकर मोजावा लागतो. त्यानुसार नागपूर-शिर्डी प्रवासासाठी हलक्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना ८९९ रुपये पथकर भरावा लागतो. आता शिर्डी-भरवीर साठी १४० रुपये पथकर असून एकूण, पथकराची रक्कम १०३९ रुपये आहे.

शिर्डीची विकासाच्या दिशेने वाटचाल

शिर्डी देवस्थानामुळे दररोज मोठय़ा संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डीत येतात. त्यामुळे आजघडीला शिर्डी विमानतळ हे सर्वाधिक गजबजलेले विमानतळ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीतून जात असून शिर्डी – भरवीर महामार्ग सुरु झाला आहे. आता शिर्डी, तसेच सिन्नर – वैजापूर भागाची समृद्धी होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी सांगितले.

महामार्गादरम्यान १८ नवनगरे

समृद्धीदरम्यान अनेक ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्राचा विकास करतानाच ७०१ किमीदरम्यान १८ नवनगरे उभारण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. १८ पैकी ३ नवनगरे ही शिर्डी परिसरादरम्यान असणार आहेत. या केंद्रांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही फायली अडवणारे नाही : फडणवीस

समृद्धी महामार्ग जाहीर झाला, तेव्हा हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार नाही, असे म्हणत अनेकांनी या प्रकल्पाला विरोध केला. अनेकांना ही केवळ घोषणा वाटली. हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी विविध गावात सभाही घेण्यात आल्या. मात्र, ज्या गावात सभा घेण्यात आल्या, त्या गावातील ग्रामस्थांनी सर्वात आधी आपल्या जमिनी दिल्या आणि आज महामार्ग झाला, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेत टीका केली. आमचे सरकार काम करणारे सरकार आहे, आमचे सरकार फायली अडवणारे नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच ‘अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक हे, और मुछे रास्ते बनाने का’, अशी शायरी सादर त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांना लक्ष्य केले.

शिर्डी टर्मिनल -२चे काम जुलैपासून

शिर्डी विमानतळावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी विमानतळाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी टर्मिनल -२ बांधण्यात येणार असून, या कामाला जुलैमध्ये सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.