मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते आहे. संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवा समाप्ती किंवा बदलीची कारवाई करण्याचा एककलमी कार्यक्रम एसटी महामंडळाने सुरू केला असून बुधवारपर्यंत महामंडळातील तब्बल १० हजार ३० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर रोजंदारीवरील दोन हजार २७ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

गेला सव्वा महिना एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार जे कर्मचारी संपकाळात कामावर हजर होते त्यांना ७ डिसेंबरला वेतन अदा करण्यात आले. मात्र संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली असून बुधवारी १२० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आत्तापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार ३० झाली आहे.

संपाबाबत तोडगा नाहीच

परिवहन मंत्री अनिल परब आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणीचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्यात बुधवारी संध्याकाळी संपावर तोडगा काढण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत गुजर यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ करण्याची मागणी केली, मात्र परिवहन मंत्र्यांनी संप मागे घेतल्यानंतरच मागणीबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितल्याने संपावर तोडगा निघाला नसल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.