The Thackeray group claim symbol difficult Andheri by elections Candidacy ysh 95 | Loksatta

धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अंतरिम आदेश अपेक्षित असून, धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम राहणे कठीण असल्याचे मानले जाते.

धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम राहणे कठीण
उद्धव ठाकरे

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अंतरिम आदेश अपेक्षित असून, धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम राहणे कठीण असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळ या चिन्हावरून झालेल्या वादावर लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेतील पाठिंबा या निकषाचा निवडणूक आयोगाने आधार घेतला होता. अन्य राजकीय पक्षांमधील वादातही हाच मुद्दा गृहीत धरण्यात आला होता. 

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मिळू नये यासाठी शिंदे गटाचा सारा खटाटोप सुरू आहे. शनिवारी सुट्टी असूनही निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली. निवडणूक आयोग शक्यतो सुट्टीच्या दिवशी कागदपत्रे सादर करण्याची मुदत किंवा अन्य कामकाज निवडणुकीचा हंगाम वगळता करीत नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घ्यावा, अशी शिंदे गटाची मागणी आहे. यानुसार निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केली आहे.  शिवसेनेने शनिवारी कागदपत्रे सादर केल्यावर पुढील दोन ते तीन दिवसांत धनुष्यबाण चिन्हावर निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. सद्य:स्थितीत धनुष्यबाण चिन्हावर अंतिम आदेश होईपर्यंत गोठविले जाण्याची शक्यता वर्तविली जाते. चिन्ह गोठविले तरी तो शिंदे गटाचा विजयच असेल. 

आढावा घेऊन निकाल

राजकीय पक्षांच्या चिन्हांवर झालेल्या वादात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी आणि पक्षसंघटनेत कोणाला किती समर्थन आहे याचा आढावा घेऊन निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळ चिन्हाचा वाद झाला असता पी ए संगमा यांच्यापेक्षा शरद पवार यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि संघटनेचे समर्थन पवारांना अधिक असल्याने घडय़ाळ हे चिन्ह पवार यांच्याकडेच कायम ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. समाजवादी पार्टी, अण्णा द्रमुक किंवा लोकजनशक्ती पार्टीच्या चिन्हावर झालेल्या वादातही निवडणूक आयोगाने खासदार-आमदार तसेच पक्ष संघटनेत कोणाला किती पाठिंबा आहे यावर निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 01:05 IST
Next Story
मध्य रेल्वेवर उद्या ‘मेगा ब्लॉक’