मुंबईः वीज बिल भरण्याचा संदेश मोबाइलवर आला आणि मिळालेल्या सूचनेनुसार मोबाइलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार गिरगाव परिसरात घडला. आरोपीने मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून बँक खात्यातून परस्पर दोन लाख रुपये काढण्यात आले. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
तक्रारदार गिरगाव परिसरात कुटुंबियांसोबत राहतात. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांना मोबाइलवर एक संदेश आला होता. चालू महिन्यांचे वीज बिल भरले नसून ते अद्याप अपडेट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या घराचा वीजपुरवठा रात्री बंद होईल, असे संदेशात नमुद करण्यात आले होते. या संदेशात एक मोबाइल क्रमांकही देणयात आला होता. त्यामुळे तक्रारदार महिलेने या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरून बोलणार्या व्यक्तीने आपले नाव देवेश जोशी असल्याचे सांगितले. ‘इलेक्ट्रीक बिल साईन’ व ‘इलेक्ट्रीक बिल अपडेट’ हे दोन मोबाइल ॲप डॉऊनलोड करण्यास त्याने तक्रारदारास सांगितले. त्यानंतर त्यांचा वीजपुरवठा बंद होणार नाही असेही सांगितले. जोशी याने सांगितल्याप्रकरणे तक्रारदार महिलेने दोन्ही मोबाइल ॲप डाऊनलोड केली. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या बँक खात्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे व्यवहार झाले होते. या व्यवहारांबाबतचे संदेश आल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन व्यवहार थांबवण्यास सांगितले. तसेच याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. तक्रारदार महिलेच्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांची माहिती बँकेकडून मागवण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील तपास केला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.