मुंबई : दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. प्रवासांचा प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) या मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या दाखल केल्या आहेत. या गाड्या बुधवारपासून सेवेत दाखल होणार आहेत. नवीन तीन गाड्या सेवेत दाखल झाल्याने आता मेट्रो गाड्यांच्या २१ फेऱ्या वाढणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या दोन्ही मार्गिकांवर २८४ फेऱ्या होतात, बुधवारपासून फेऱ्यांची संख्या ३०५ वर जाणार आहे.
मेट्रो २ अ आणि व मेट्रो ७ पश्चिम उपनगरवासियांसाठी महत्त्वाची अशी मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळेच या मार्गिकेला आता मुंबईकरांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकांवरून दिवसाला केवळ ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र २०२४ पासून प्रवासी संख्येत मोठी वाढ होत गेली आणि त्यामुळेच आजघडीला दिवसाला अडीच ते तीन लाखांदरम्यान प्रवासी प्रवास करीत आहेत. नुकतीच या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला होता. एकूणच प्रवासी संख्या वाढत असल्याने आणि भविष्यात यात आणखी वाढ होणार असल्याने वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेत प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलने नव्या गाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार गेल्या आठवड्यात दोन गाड्या गर्दीच्या वेळी चालवून पाहण्याचा प्रयोगही करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता या मार्गिकांवरील गाड्यांच्या ताफ्यात तीन नवीन गाड्या वाढविण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएलकडून देण्यात आली. या नवीन तीन गाड्या बुधवार सकाळपासून सेवेत दाखल होणार आहेत. सध्या या मार्गिकांवर २१ गाड्या धावतात, आता त्यात वाढ होऊन बुधवारपासून या मार्गिकांवर २४ गाड्या धावणार असल्याचेही एमएमएमओसीएलकडून सांगण्यात आले.
तीन नवीन गाड्या सेवेत दाखल होणार असल्याने मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवर २१ फेऱ्या वाढणार आहेत. सध्या या मार्गिकांवर दिवसाला मेट्रो गाड्यांच्या २८४ फेऱ्या होतात. बुधवारपासून या फेर्यांची संख्या ३०५ अशी होणार आहे. फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याने बुधवारपासून गर्दीच्या वेळी मेट्रो गाड्यांची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) सुधारणार आहे. गर्दीच्या वेळी ६.३५ मिनिटांऐवजी ५.५० मिनिटांनी एक गाडी सुटणार आहे. त्यामुळे बुधवारपासून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.