चाळकऱ्यांना मोठा दिलासा
चाळीमधील घरात अथवा झोपडपट्टी परिसरात शौचालय बांधण्यासाठी घरमालकाच्या परवानगीची आवश्यकता भासत होती. परंतु घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी चाळमालकाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात एकमताने मंजूर केला आहे. पालिका प्रशासनही याबाबत अनुकूल आहे. त्यामुळे भविष्यात चाळीतील घरात अथवा झोपडपट्टीमध्ये शौचालय बांधण्यासाठी घरमालकाच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. यामुळे चाळकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर भारतातील शहरे आणि गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घराघरात शौचालय अशी योजना सुरू केली. मुंबईमध्ये झोपडीमध्ये शौचालय बांधण्याच्या योजनेची पालिकेमार्फत अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार, तसेच पालिकेकडून अनुदानही देण्यात येत होते. मात्र काही ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरात मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे नसल्याने ही योजना राबविण्यात पालिकेला तितकेसे यश मिळाले नाही. त्याऐवजी झोपडपट्टी परिसरात सामुहिक शौचालय उभारण्यावर पालिकेने जोर दिला आहे.
‘ना हरकत’ प्रमाणपत्राची अट शिथिल
घरोघरी शौचालय बांधण्यासाठी घरमालकाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची सक्तीची अट शिथिल करावी, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना दक्षा पटेल यांनी सभागृहात सादर केली होती. या ठरावाच्या सूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा दिला. त्यामुळे महापौरांनी या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली. आता ही ठरावाची सूचना पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली आहे.