कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त शंकर भिसे यांची रविवारी तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आचारसंहितेच्या काळात स्थायी समितीची बैठक घेऊन त्यात त्यांनी दहा कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने भिसे काहीसे अडचणीत आले होते. या बैठकीमुळे झालेला आचारसंहिता भंगच भिसे यांच्या बदलीस कारणीभूत असल्याचे बोलले जात आह़े
आयुक्तपदाचा पदभार भिसे यांनी नऊ महिन्यांपूर्वी स्वीकारला होता. आचारसंहितेच्या काळात घेतलेल्या स्थायी समिती बैठकीप्रकरणी मनसेचे पदाधिकारी इरफान शेख यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे मतदारांवर भुरळ घालण्यासाठी अशा प्रकारचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच असे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही आयुक्तांनी स्थायी समिती बैठक घेऊन त्यास मंजुरी दिली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला, असे तक्रारीत शेख यांनी म्हटले होते. या प्रकरणी स्थायी समिती सभापती, आयुक्तांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली होती. ही तक्रारच आयुक्तांना भोवल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, आयुक्तपदावरून हटविण्यात आलेल्या भिसे यांना निवडणूक कामापासून दूर ठेवावे आणि त्यांना त्यांच्या मूळ महसूल व वनविभागात पाठविण्यात यावे, असे आदेश शासनाने काढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आपणास पुढील आदेश येईपर्यंत शासनाने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळण्यास आदेश दिले आहेत, असे प्रभारी आयुक्त पाटील यांनी सांगितले. माजी आयुक्त भिसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने आयुक्तांची बदली झाल्याचे स्पष्ट करून अधिक बोलणे टाळले.
तक्रारीच तक्रारी..
आयुक्त भिसे यांनी बहुतांशी सेवा महसूल व मुख्यमंत्री कार्यालयात केली आहे. तेथील ‘बडय़ा’ ओळखींमुळे आपणास कोणी काहीही करू शकत नाही, अशी भावना भिसे यांच्यात होती. त्यांच्या काळात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू होती. विकासक, ठेकेदारधार्जिणे धोरण अवलंबण्यात येत होते. या वर्षी पालिकेचा महसूल १६७ कोटीने कमी वसूल झाला. ‘कुचकामी’ पालिका अधिकाऱ्यांच्या गराडय़ात ते होते. या सर्व तक्रारी शासनाच्या नगरविकास विभागात दररोज पोहचत होत्या. या सर्व तक्रारींची दखल घेऊन शासनाने भिसे यांची बदली केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
नाशिक पालिका आयुक्तांचीही बदली
नाशिक महापालिका आयुक्त संजय खंदारे यांची रविवारी आचारसंहिता भंगप्रकरणी तडकाफडकी बदली करण्यात आली. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे पालिका आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी विविध कामांच्या काही निविदा काढल्याने ते वादात सापडले होते. आचारसंहिता असतानाही खंदारे यांनी एका ठेकेदाराला २१ लाख रुपयांचा दंड माफ केला होता. याशिवाय बचत गटांना कर्ज देण्यासाठी पालिकेच्या वतीने शिफारस केली होती. जुनी तारीख टाकून ठेकेदाराला एक कंत्राटही देण्यात आले होते. अशा आचारसंहिता भंगाच्या आठ तक्रारी नगरसेवक संजय चव्हाण यांनी आधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व नंतर राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या़