मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाअंतर्गत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची शेवटची म्हणजेच तिसरी प्रवेश यादी गुरुवार, ५ जून रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून ६ ते १० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्रथम वर्ष पदवी प्रवेशाच्या पहिल्या प्रवेश यादीनुसार पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) दोन ते चार टक्क्यांनी घटले होते, तर स्वयंअर्थसाहाय्यीत अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत पारंपरिक आणि स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेनुसार सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे अनेक महाविद्यालयांकडून संबंधित अभ्यासक्रमांसाठीची दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे आता अनेक महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी मर्यादित जागा आणि त्यासाठी अधिक प्रवेश अर्ज असल्यामुळे तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत प्रवेश पात्रता गुणांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे.