लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शिक्षक, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम, शिक्षकांचा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार, राज्यमंडळ, विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांची पस्तीस टक्के पदे रिक्त अशी परिस्थिती असतानाही मंडळाने यंदा नेहेमीपेक्षा लवकर बारावीचा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे.

महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्यमंडळ) दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणारा बारावी परीक्षेचा निकाल यंदा एक आठवडा लवकर जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीपेक्षा दहावीचा निकालही एक आठवडा आधी जाहीर होणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकांची तपासणीही सुरू होते. गेल्या काही वर्षांच्या शिरस्त्याप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. तो काहीच दिवसांत मागेही घेण्यात आला. मात्र अनेक शिक्षकांना आणि मंडळातील कर्मचाऱ्यांनीही निवडणुकीचे काम लावण्यात आले. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची तपासणी सुरळीत होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता.

आणखी वाचा-पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम तूर्तास स्थगित

राज्यमंडळ, विभागीय मंडळात सध्या ५४० कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्याशिवाय जवळपास ३५ टक्के पदे रिक्त आहेत. असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही अनेकांना निवडणुकीचे काम होते. राज्यभरातून १५ लाख १३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या साधारण ८ विषयांच्या उत्तरपत्रिका यानुसार जवळपास १ कोटी २१ लाख उत्तरपत्रिकांचे शिक्षकांना वाटप, त्यांची तपासणी, ती झाल्यावर त्या गोळा करणे, तपासलेल्या काही उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी, त्यानंतर त्या गोळा करून त्या स्कॅन करणे, त्यानंतर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे शाळेकडून आलेले गुण आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्र करण्यात येतात. त्यानंतर निकाल तयार होतो आणि गुणपत्रिका तयार केल्या जातात. परीक्षा संपल्यानंतर महिन्याभरात मूल्यांकनाचे काम पूर्ण होते. यंदा ते वीस दिवसांत झाले.

आणखी वाचा-सीईटी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्तरपत्रिका मागवण्याऐवजी त्या आपली यंत्रणा वापरून गोळा केल्या. त्यासाठी एक मार्ग निश्चित करून प्रत्येक टप्प्यावरील दिवस निश्चित करून तेथील उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या. नियमनाबाबतही अशीच पद्धत अवलंबली. ठराविक कालावधी निश्चित करून विभागीय स्तरावरच उत्तरपत्रिकांचे नियमन करण्यात आले. प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षेचे गुण लेखी मागवण्याऐवजी (ओएमआर पत्रिका) त्यासाठी स्वतंत्र लिंकवर ते भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे त्या टप्प्यावरील वेळही वाचला. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या मुंबई विभागातील निकाल यंदा सर्वात लवकर तयार झाला होता.

मंडळातील कर्मचारी, शिक्षक नेहेमीच परीक्षेच्या कामात सहकार्य करतात. यंदा निवडणुकीचे काम असणार याची जाणीव सर्वांनाच होती. अनेकांची नियुक्तीही झाली होती. त्यामुळे कमीत कमी वेळात काम पूर्ण करण्याचे सर्वांनीच मनावर घेतले. सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करता आला, असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.