लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांची घरटी तसेच विणीचा हंगाम लक्षात घेऊन पवई तलावातील जलवाहिनी मार्ग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) लगतच्या भागातील जलपर्णी काढण्याचे काम तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. विणीचा हंगाम संपल्यानंतर या ठिकाणची जलपर्णी काढण्याची कामे करावी, अशी पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी केलेली मागणी महापालिकेने मान्य केली आहे.

पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरू आहे. एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. जलपर्णी काढताना पक्ष्यांची घरटी, तसेच त्यांचा विणीचा हंगाम लक्षात घेता जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या लगतची जलपर्णी काढण्याचे काम १० जूनपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मुंबई : अग्निशमन दलातील जवान चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित

पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्यानंतर काही निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्याची तत्काळ दखल घेऊन या सूचनांचा समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये करता यावा, यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचे पदाधिकारी यांनी शनिवारी १८ मे रोजी पवई तलाव क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, महत्त्वपूर्ण निरीक्षणांसह स्थळ पाहणी अहवाल मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात आला.

पवई तलाव येथे काही ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे, त्या ठिकाणी या पक्ष्यांचा विणीचा हंगाम साधारणपणे १० जूनपर्यंत आहे. प्रामुख्याने जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई यांच्या बाजूस पक्ष्यांची घरटी आढळली आहेत. त्यामुळे विणीचा हंगाम संपल्यानंतर या ठिकाणची जलपर्णी काढण्याची कामे करावीत, अशी विनंती पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी केली आहे. ती विनंती मान्य करून महानगरपालिकेने त्या बाजुचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवले आहे. १० जून २०२४ नंतर त्या बाजूचे काम पुन्हा सुरू केले जाईल. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदविली होती. आदि शंकराचार्य मार्गालगतच्या बाजूस पक्ष्यांचा अधिवास आढळला नसल्याने त्या बाजूचे जलपर्णी काढण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा-मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा, कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पवई तलावास प्रत्यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी केली. तसेच, याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेस सादर केला. पाहणी पथकात ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या नियामक मंडळाचे सदस्य देबी गोयंका, उपसंचालक राहुल खोत, पक्षीनिरीक्षक तथा पवईतील रहिवासी मैत्रेयी, उषा नुरनी यांचा समावेश होता.

जलवाहिनी मार्गाच्या बाजूने पवई तलावाची पाहणी करताना शेकाट्या, बगळे, कमळपक्षी, पाणकोंबडी, बदक, टिटवी, अडई पक्षांचा अधिवास असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी हार्वेस्टर यंत्राद्वारे जलपर्णी काढण्यात येत असल्याने जलचर पक्ष्यांच्या विहारात व्यत्यय निर्माण होत असल्याचे लक्षात आले. तलावाच्या काठावरील झाडीझुडपे, तरंगत्या वनस्पती या जलचर पक्ष्यांच्या अधिवासासाठी, घरट्यांसाठी योग्य जागा आहेत. तलावाच्या काठावर शेकाट्या पक्ष्यांची घरटी असल्याचे स्थानिक पक्षी निरीक्षकांना आढळून आले. त्यामुळे त्या ठिकाणी जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने महानगरपालिका प्रशासनाने शक्यतोवर पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती अभ्यासकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ८ मार्च २०२४ पासून सुरू आहे. कार्यादेशाप्रमाणे एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, आतापर्यंत सुमारे १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ५५ टक्के इतकी जलपर्णी काढून कचराभूमीवर वाहून नेण्यात आली आहे.