|| प्रसाद रावकर

मागील निवडणुकीत काम केलेल्या ४७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा विचार

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची अपेक्षा असून करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी मनुष्यबळाचा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. अवघे चार महिने हाती असल्यामुळे मागील निवडणुकीच्या प्रक्रियेचे काम केलेल्या पालिका आणि अन्य यंत्रणांतील ४७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची फौज यावेळी तैनात करण्याच्या विचारात प्रशासन आहे. करोना संसर्ग नियंत्रणात असला तरी निवडणुकीच्या कामाचा भार पडण्याच्या शक्यतेची कुणकुण लागल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

मुंबई महापालिकेतील विद्यामान नगरसेवकांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहे. भाजपने तर सत्ताधारी शिवसेनेवर निरनिराळ्या मुद्द्यांवरून आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे, तर भाजपवर पलटवार करून जनमानसात आपली प्रतिमा स्वच्छ राखण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत.

एकीकडे राजकीय कलगी-तुरा रंगू लागलेला असतानाच प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. मतदार याद्यांमधील दुरुस्ती, प्रभाग रचना यासह विविध निवडणूकपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांसाठी पालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील प्रत्येकी १० कर्मचाऱ्यांची पाठवणी करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य कर्मचारी करोनाकाळात कर्तव्यावर होते. करोना संसर्ग नियंत्रणात येत असताना निवडणुकीचे काम हाती सोपविण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. अनेकांनी या कामातून सुटका करण्यासाठी राजकारण्यांच्या कार्यालयाचे उंबरठेही झिजविले, तर काहींनी अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने काम टाळण्याचे प्रयत्नही करून झाले. अखेर नाराजी व्यक्त करीत ही मंडळी निवडणुकीच्या कामात रुजू झाली.

मुंबईत करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली. मात्र या काळातही पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात         

आली होती. पालिकेतील बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाविषयक कामांसाठी तैनात करण्यात आले होते. करोनाची दुसरी लाट ओसरू लागताच कर्मचाऱ्यांची मूळ कामावर पाठवणी करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचेही काम करावे लागणार या विचाराने कर्मचऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे दिवाळीनंतर प्रत्यक्षात शाळा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यातच निवडणुकीच्या कामाचा भार वाहावा लागण्याच्या शक्यतेने शिक्षकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या कामाची जबाबदारी पालिकेसह अन्य यंत्रणांतील मिळून ४७ हजार ०५४ कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. यावेळीही याच कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाचारण करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचा अनुभव आहे. त्यामुळे संबंधितांना निवडणुकीच्या कामावर बोलविण्याचा विचार सुरू आहे. पालिकेच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील १० हजार ३४२ शिक्षक (सहा हजार २५५ महिला, चार हजार ०८७ पुरुष), अन्य माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील नऊ हजार ७८० शिक्षक ( सहा हजार २७० महिला आणि तीन हजार ३९८ पुरुष), पालिका आणि इतर शाळांमधील २३ हजार २९२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. पालिका आणि अन्य यंत्रणांतील तीन हजार ६४० कर्मचारीही मागील निवडणुकीत कार्यरत होते. या सर्वांना पुन्हा निवडणुकीचे काम करावे लागण्याची चिन्हे आहेत.