मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आपल्या पत्नीसह तान्ह्या बाळाला करोनाग्रस्तांसाठी नव्यानं रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्यानंच त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे. याव्यतिरिक्त सदर नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेनं आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितलं,” अशी माहिती महिलेच्या पतीनं दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सध्या या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

“२४ तासांनंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला. आम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आलं होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसंच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं,” असा आरोपही महिलेच्या पतीनं केला आहे. “जर आम्हाला या गोष्टीची कल्पना असती तर आम्ही आमचे कपडे बदलले असते किंवा स्वत:ला सॅनिटाईझ केलं असतं. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती,” असंही त्यांच्या पतीनं नमूद केलं. “ही वर्टिकल ट्रान्समिशनची केस आहे का याबद्दल आम्हाला कल्पना नाही. हे एक वैद्यकीय कायदेशीर प्रकरण आहे. बाळाला जन्मापासूनच व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असू शकते,” असं एका अन्य डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three days new born baby and his mother tested coronavirus positive chembur mumbai case jud
First published on: 02-04-2020 at 07:43 IST