महापालिकेकडून काम हाती; विकासकामांसाठी माहितीचा उपयोग; वरळीत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
मुंबई : मुंबईची प्रत्येक गल्ली, रस्ता, इमारत, समुद्रकिनारे, कांदळवन, नद्या, नाले यांचे त्रिमिती (थ्रीडी) नकाशे तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. गूगल नकाशापेक्षाही अद्ययावत असे हे नकाशे असतील. वरळी, प्रभादेवी परिसराचे नकाशे तयार करण्यात आले असून येत्या काळात संपूर्ण मुंबईचा नकाशा पालिका तयार करणार आहे. विकासकामांमध्ये या नकाशाचा उपयोग होणार आहे.
गूगल नकाशावर जाऊन मुंबईतील कुठल्याही गल्लीबोळातली ठिकाणे शोधण्याची मुंबईकरांना सवय आहे. अशाच पद्धतीचा, पण अधिक अद्ययावत असा त्रिमितीय नकाशा आता पालिका स्वत: तयार करीत आहे. प्रोयोगिक तत्त्वावर याची सुरुवात वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील प्रत्येक जागेचा त्रिमिती नकाशा तयार करण्यात आला आहे. ड्रोन आणि उच्च प्रतीच्या कॅमेराचा वापर करून हे नकाशे तयार करण्यात आल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. जानेवारीपासून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात संपूर्ण मुंबईचा नकाशा कॅमेराबद्ध केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उपयोग काय?
- पालिकेने काही वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व बांधकामांचे लिडार सर्वेक्षण केले होते. मात्र ती केवळ छायाचित्रे होती. तर या नव्या पद्धतीतील नकाशांमुळे एखाद्या जागेचे मोजमापही करणे शक्य होणार आहे. या माहितीचा पालिकेच्या सर्व विभागांना उपयोग होणार आहे.
- एखाद्या विकासकामामध्ये नक्की किती इमारती किती गोष्टी प्रभावित होतील याची माहिती मिळू शकणार आहे.
- खूप पाऊस पडला तर पाणी कुठे भरू शकते त्याची माहिती कळू शकेल.
- मालमत्ता किती आहेत त्याची माहिती मिळाल्यामुळे मालमत्ता कर आकारणीसाठी उपयोग होईल.
- कुठे आग लागली तर कोणत्या मार्गाने जायचे हेही अग्निशमन दलाला ठरवता येईल.
या संपूर्ण नकाशाची मालकी पालिकेची असणार आहे. त्यामुळे फक्त पालिकेच्या सर्व विभागांनाचा त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. तसेच अतिरेक्यांकडून किंवा समाजकंटकांकडून याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. नागरिकांना याचा वापर करू देण्याची गरज भासल्यास मर्यादित स्वरूपातच वापर करू दिला जाऊ शकतो.
– शरद उघडे, साहाय्यक आयुक्त, जी दक्षिण