मुंबई: चेंबूर कॉलनी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका घराचा छत कोसळून घरातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास चेंबूर कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. तेथे भाड्याने एक कुटूंब राहत होते. त्या घराची अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था होती. याबाबत भाडेकरूंनी घर मालकाला त्याची कल्पना देखील दिली होती. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी रात्री अचानक संपूर्ण छत खाली कोसळले. यावेळी या घरात एक ४० वर्षीय इसम तसेच दोन अल्पवयीन मुले होती. यातील काव्या (७) आणि मयंक (१२) या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. चेंबूर पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमींना बाहेर काढले. सध्या त्यांच्यावर चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.