मुंबई : नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक नगरसेवक असणारा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी जास्तीत जास्त ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवून सत्ता महाविकास आघाडीकडे राहावी यासाठी तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसे पत्रकच तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
या पत्रकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सह्या आहेत. नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे मिळून सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून आता जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून यावेत यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे.
आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली असून तिघांना मिळालेले यश कायम ठेवायचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नगर पंचायतींमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांचा नगराध्यक्ष होणे अत्यावश्यक आहे. यासाठी स्थानिक नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीतील पक्षांचे निवडून येतील यादृष्टीने काम करावे, असे आवाहन या तिन्ही नेत्यांनी केले आहे.