लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या एक टोळीला विक्रोळी पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून अटक केली. या टोळीने मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळी परिसरात राहणारे दिलीप रांगणकर (६७) १६ मार्च रोजी दुपारी पत्नीसह टागोर नगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. काही वेळानंतर परतलेल्या रांगणकर यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील चार लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
आणखी वाचा- बदलापूर रेल्वे स्थानकाचा परिसर कात टाकणार; ‘सॅटिस’ प्रकल्पाअंतर्गत ५०० मीटर परिसराचा विकास होणार
पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. कॅमेऱ्यातील चित्रणात आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून लतीफ खानला (५०) अटक केली. त्यानंतर फरमान अन्सारी (५३) आणि शमीम अन्सारी (५३) या दोघांना दिल्ली येथून अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.