मुंबई : राज्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्था आणि दाते यांच्यातील सेतू बनलेल्या ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाची शुक्रवारी सांगता होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात यंदाच्या दहा संस्थांना मदतीचे धनादेश सुपूर्द केले जातील. माटुंग्यातील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमास मुक्त प्रवेश असणार आहे. यावेळी गिरीश कुलकर्णी यांना भेटण्याची संधी उपस्थितांना मिळेलच; शिवाय दात्यांच्या मदतीच्या धनी ठरलेल्या यंदाच्या दहा संस्थांच्या प्रतिनिधींचे अनुभवही ऐकण्यास मिळणार आहेत.

‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या निवडक संस्थांच्या कार्याची गणेशोत्सवादरम्यान ओळख करून देण्यात येते आणि त्याद्वारे राज्यभरातील वाचक-देणगीदारांना मदतीचे आवाहन करण्यात येते. यंदाही दात्यांनी या उपक्रमाला आणि निवडलेल्या संस्थांच्या कार्याला भरभरून पाठबळ दिले. कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने दिलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. हा दानयज्ञ शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमातून सुफळ संपूर्ण होईल. या कार्यक्रमात संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येतील.

यंदाच्या उपक्रमात सहभागी संस्था

कुमार गंधर्व प्रतिष्ठान, स्वस्तिक फाऊंडेशन, अवनि, डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर, निर्मिती प्रतिष्ठान, स्नेहांचल, ‘रिअल लाईफ, रिअल पीपल्स’, सुधर्मा ज्ञानसभा, प्रतीक सेवा मंडळ आणि सिटिजन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन.

दातृत्वाचे तप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम गेली बारा वर्षे अविरत सुरू आहे. या एका तपाच्या कालावधीत १२२ संस्थांची ओळख वाचकांना करून देण्यात आली आहे. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक संस्थांना वाचकांनी, दात्यांनी घसघशीत अर्थसाहाय्य केले आहे. संस्थांनीही कार्यविस्तार करून मिळालेल्या दानाचे चीज केले आहे.