अक्षय मांडवकर

मोठय़ा प्रदर्शन टाकीअभावी देखभालीत अडचणी; समुद्री कासवांविना मत्स्यालय ओकेबोके

चर्नी रोड येथील प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालयातील समुद्री कासवांसाठीची प्रदर्शन टाकी पुन्हा ओकीबोकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी मस्त्यालयात दाखल झालेल्या ‘तारा’ या ‘ग्रीन सी’ प्रजातीच्या मादीला शुक्रवारी नाइलाजाने समुद्रात सोडण्यात आले. मत्स्यालयात मोठी प्रदर्शन टाकी नसल्यामुळे ‘तारा’ची देखभाल व्यवस्थित होत नव्हती. महिनाभर डहाणूतील शुश्रूषा के ंद्रात तिची देखभाल केल्यानंतर शुक्रवारी तिला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

मे २०१८ मध्ये मत्स्यालयातील सर्वात जुन्या २५ ते ३० वर्षे वयाच्या दोन सागरी कासवांचा आकस्मिक मृत्यू झाला. तर ‘ग्रीन सी’ प्रजातीची साधारण पाच ते सहा वर्षांची मादी कासव गंभीर आजारी होती. त्या वेळी मरणासन्न अवस्थेतील या मादीला पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी डहाणूतील सागरी कासव शुश्रूषा के ंद्रात हलविले. तारापोरवाला मत्स्यालयातूून आल्याने केंद्रातील स्वयंसेवकांनी तिचे नामकरण ‘तारा’ असे केले. पोटाचा संसर्ग झाल्याने ताराला अन्नग्रहण करण्यास त्रास होत होता. ४५ दिवस उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये तिची रवानगी पुन्हा मत्स्यालयात करण्यात आली.

भरविल्याशिवाय ती खाद्य ग्रहण करीत नसल्याने डॉ. विन्हेरकर यांनी तिला प्रदर्शित न करण्याचा सल्ला दिला होता. पाच महिन्यांच्या देखभालीनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने विन्हेरकर यांनी सांगितल्याप्रमाणे तिला प्रदर्शन टाकीत सोडण्यात आले. मात्र टाकी फारच लहान पडत होती. अपुरी इच्छाशक्ती आणि तांत्रिक कारणांमुळे ‘तारा’करिता मोठी प्रदर्शन टाकी बांधणे मत्स्यालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाला जमले नाही. त्यामुळे अखेरीस ३१ जानेवारी रोजी डॉ. विन्हेरकर यांनी तिला पुन्हा डहाणूला हलविले. या ठिकाणी डहाणूचे मानद वन्यजीवरक्षक धवल कन्सारा यांच्या ‘डब्लूसीएडब्लूए’ या प्राणिप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिची देखभाल केली. शुक्रवारी ‘तारा’ला वन विभाग आणि मत्स्यालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने समुद्रात सोडण्यात आले.

ताराला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय पूर्णपणे तांत्रिक कारणांमुळे घेण्यात आला आहे. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाची परवानगी घेण्यात आली होती.

– पुलकेश कदम, अभिरक्षक, तारापोरवाला मत्स्यालय

मायक्रोचिप बसवून रवाना 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताराच्या शरीरात युनिव्हर्सल मायक्रोचिप बसवून तिला समुद्रात सोडण्यात आले आहे. या मायक्रोचिपमुळे तारा भविष्यात एखाद्या किनाऱ्यावर वाहून गेल्यास तिची ओळख पटविणे शक्य होणार आहे. तांदळाच्या दाण्याएवढय़ा या मायक्रोचिपमध्ये एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक असतो. ही चिप कासवाच्या मागील पायामधील कवचाखालील त्वचेच्या पोकळीमध्ये बसविली जाते. चिप बसविलेले कासव दुसऱ्या समुद्रकिनाऱ्यावर आढळल्यास मायक्रोचिपरीडरच्या साहाय्याने त्याच्या सांकेतिक क्रमांकाची माहिती मिळवता येते.

ताराला पोहण्यासाठी मोठय़ा जागेची आवश्यकता होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे मोठी टाकी बांधणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे तिला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महिनाभर तिची देखभाल करण्यात आली. पोहण्याची क्षमता तपासण्यासाठी तीन जलतरण चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतरच तिला समुद्रात सोडण्यात आले.

– डॉ. दिनेश विन्हेरकर, पशुवैद्यक