महाराष्ट्रातील सध्याच्या भाजपप्रणित सरकारने पर्यटन क्षेत्राला महत्व देत या क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली. असे असले तरी मुंबईत ‘पर्यटन स्वागत केंद्र’ स्थापण्यासाठी पर्यटन विभागाला महत्त्वाच्या ठिकाणी जागा मिळवणे चांगलेच कठीण जात आहे. दरवर्षी जवळजवळ पन्नास लाख पर्यटक राज्यात येतात. या पर्यटकांना पर्यटनस्थळ, प्रवास योजना आणि प्रवासाचा कार्यक्रम आखण्यास मदत व्हावी, हा पर्यटक स्वागत केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. गोवा, ओडिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अशाप्रकारचे केंद्र त्या त्या राज्यांच्या राजधानीत उभारण्यात आले आहेत. मुंबईतील कफ परेड, मरिन ड्राईव्ह आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या महत्वाच्या ठिकाणी जागा मिळण्यात अपयश आल्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने वडाळा येथील एका जागेचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. जवळजवळ पाच वर्षापेक्षा अधिक वणवणीनंतर राज्य सरकारने ही जागा देऊ केली आहे. वडाळा येथील विक्री कर कार्यालयाशेजारचा ४००० स्वेअर मीटरचा भूखंड जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुचविण्यात आला असला, तरी सध्या हे सर्व प्राथमिक पातळीवर सुरू असल्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्राचे मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या प्रस्तावावर विभागीय पातळीवर विचार सुरू असला, तरी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मुंबईतील इतर जागांच्या तुलनेत वडाळा फार दूर असल्याने अधिकाऱ्यांना यात फार रस नसल्याचे एमटीडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. येणाऱ्या काळात वडाळा हे मुंबईतील एक मोठे व्यापारी केंद्र होणार असल्याचे बोलले जात असले, तरी वडाळ्याच्या विकासासाठी फार मोठा कालावधी लागणार आहे. दक्षिण मुंबई हे सर्वात सोयीस्कर ठिकाण असून, मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांचे येथेच वास्तव्य असल्याचा मुद्दा त्याने मांडला.