मुंबईजवळ समुद्रात एका मालवाहू जहाजावर वायुगळती झाल्यामुळे तीन खलाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पोलिसांनी दिले आहे. तसेच, दोन खलाशांवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईजवळील समुद्रात ओरियन-२ या मालवाहू जहाजावर शुक्रवारी वायुगळती झाली. या विषारी वायुचे श्वसन केल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांवर उपचार सुरू आहेत. मंगेश भोसले, जयंत चौधरी आणि क्रितीक अशी मृत खलाशांची नावे आहेत.
घटना झाल्यानंतर तटरक्षक दलाला संपर्क साधण्यात आला होता. त्यांनी खलाशांना तातडीने रुग्णालयात नेले. हे जहाज मुंबईपासून चार सागरी मैलांवर होते. शुक्रवारी रात्री वायुगळती झाल्यामुळे खलाशांना अत्यवस्थ वाटू लागले होते. सांडपाण्याच्या टाकीतून हा विषारी वायू बाहेर आल्याचे नंतर समजले. वायुगळती झाल्याचे समजताच चार जणांनी समुद्रात उड्या मारुन आपले प्राण वाचवले. तर पाच जणांना अत्यवस्थ वाटत असल्यामुळे ते तिथेच थांबले. तटरक्षक दलाच्या सी-१५४ हे जहाज घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या सर्वांना रुग्णालयात नेले. पाच पैकी तिघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. एका जणाची प्रकृती गंभीर असून त्यास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.