हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी लोकलचे ६ डबे रूळांवरून घसरले. सकाळी पावणेदहाच्या सुमारास माहीमजवळ ही दुर्घटना घडली. ही लोकल सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. ही लोकल ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार होती, त्यासाठी ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रॅकवरुन ५ नंबरच्या ट्रॅकवर जाताना लोकलचे सहा डबे रुळांवरून खाली घसरले. यात एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले असून हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर व पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या माहीम स्थानकाजवळ ही घटना घडली. गणेश चतुर्थीमुळे आज हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची फारशी वर्दळ नसली तरी लोकलमधून गणपती घरी आणणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.

https://twitter.com/WesternRly/status/900946616730779648

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात एक्स्प्रेस गाड्यांना झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुजफ्फरनगरमधील खतौलीजवळ रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. त्यात २४ जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास दीडशे प्रवासी जखमी झाले होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या घटनेला जबाबदार धरून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यानंतर पुन्हा अपघात झाला. कैफियत एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले. यात ७४ प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता. यापैकी मित्तल यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. तर रेल्वेमंत्री सुरेस प्रभू यांना मोदींनी तुर्तास थांबण्याचे आदेश दिले आहेत.