लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावर (कोस्टल रोड) शनिवारी झालेल्या अपघातात ३८ वर्षीय ट्राफिक वॉर्डनचा मृत्यू झाला. कोस्टलरोडवरून वाहतूकीचे नियम मोडून टेम्पो गेल्यामुळे पाहणी करण्यासाठी वॉर्डन दुचाकीवरून गेला होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो समुद्रात पडला. गावदेवी पोलिसांच्या हद्दीतील अमरसन गार्डनजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
रफिक वजीर शेख(३८) असे मृत वॉर्डनचे नाव असून रफिक शेख हे शनिवारी मुंबई कोस्टल रोडवर कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेपाच वाजता धर्मवीर संभाजी राजे कोस्टल रोडवर टाटा गार्डनहून वरळीकडे एक टेम्पो वेगात चालला होता. अवजड वाहनांना कोस्टल रोडवर बंदी असल्यामुळे टेम्पो थांबवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन रफिक शेख यांनी टेम्पोला थांबवण्यास सांगितले. पण तो निघून गेला.
काहीवेळाने शेख यांनी आपल्या दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला. कोस्टल रोडवरील एका वळणावर शेख यांचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट दुभाजकाला धडकली. धडकेनंतर शेख हे पुलावरून समुद्रात फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेख यांना पाण्यातून बाहेर काढले. शेख यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रेती व वळणामुळे अपघात
अमरसन गार्डनजवळील कोस्टल रोडवरील रस्त्याच्या कडेला रेती होती. त्यावेळी तेथील वळणावर शेख यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला रेती असल्यामुळे त्यावरून त्यांची दुचाकी घसरली व शेख थेट समुद्रात फेकले गेले. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली. शवविच्छेदनानंतर शेख यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वीही अपघातात अनेकांचा मृत्यू
कोस्टल रोडवरून नुकताच ताडदेव पोलिसांच्या हद्दीत मोटरगाडीचा अपघात झाला होता. त्यात १९ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता, तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला होता. मोटरगाडीचा वेग प्रचंड असल्यामुळे मोटरगाडी दोनवेळा पलटी झाली होती. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी तरूणाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात हिरे व्यापाऱ्याच्या भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत कोस्टल रोड येथे कामगाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याशिवाय कोस्टल रोडवर दोन अपघात झाले होते. त्यात तिघे जखमी झाले होते.