१३० सेवांना फटका

मध्य रेल्वेमार्गावरील विघ्नांची मालिका पुन्हा सुरू असून, गुरुवारी सकाळी सकाळी पारसिक बोगद्यात रुळाला तडा गेला. मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावर हा तडा गेल्याने ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला. या एका तासात तब्बल २० सेवा रद्द झाल्याने सकाळच्या वेळी गाडय़ांना गर्दी होती. तर या बिघाडामुळे दिवसभरात तब्बल १३० सेवांना फटका बसला.
दिवा आणि ठाणे या स्थानकांदरम्यान असलेल्या पारसिक बोगद्यातील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रुळाला गुरुवारी सकाळी ७.४० वाजता तडा गेला. हा बिघाड बोगद्यात झाल्याने तो दुरुस्त करणे आव्हानात्मक होते. त्याच वेळी कल्याणकडे जाणाऱ्या जलद गाडय़ांची वाहतूकही सुरू असल्याने हे काम आव्हानात्मक होते. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल ५० मिनिटांचा कालावधी लागला. सकाळी ८.३०च्या सुमारास या मार्गावरून नेहमीच्या वेगाने गाडय़ा धावण्यास सुरुवात झाली.